कणकवलीत व्यावसायिकांचे दोन गट भिडले ; महिलेसही मारहाण

फ्लाय ओव्हर ब्रिज खालील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 17, 2023 12:01 PM
views 994  views

कणकवली : कणकवली शहरात पटवर्धन चौकात फ्लाय ओव्हर ब्रिज खाली दुकान लावण्यावरून झालेल्या वादातून फ्लाय ओव्हर ब्रिज खालील व्यवसायिकांचे दोन गट एकमेकाला भिडले. यात एका महिलेला देखील मारहाण झाली असून यापूर्वी वादग्रस्त असलेल्या एका व्यवसायिकाला देखील मारहाण झाल्याचे समजते.

दरम्यान एकमेकांना धक्काबुक्की करत असताना एकाचे भाजीचे दुकान देखील फेकून दिल्याची घटना या प्रसंगी घडली. त्यानंतर महिलेच्या अंगावर खुर्ची देखील फेकून मारल्याचे समजते. दरम्यान या घटनेनंतर काही वेळाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र ब्रिज खालील असलेल्या अनधिकृत विक्रेत्यांना पुन्हा दुकाने थाटण्याकरिता दिली गेलेली अघोषित सवलत याबाबत प्रशासनाकडून होत असलेली डोळेझाक याला कारणीभूत असल्याची चर्चा कणकवली शहरात सुरू आहे. या हाणामारी नंतर फ्लाय ओव्हर ब्रिज खालील मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्स समोर हा प्रकार घडला.

सकाळी झालेल्या या फ्री स्टाईल हाणामारीमुळे कणकवली शहरातील फ्लाय ओव्हर ब्रिज खाली बसणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. याबाबत प्रशासन व पोलीस काय भूमिका घेणार ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.