
सावंतवाडी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मंगळवारी किनळे माऊली मंदिर स्टॉपजवळ एका बलेनो गाडीतून गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करताना बलोनो कारसह दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे ११ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या पथकाला गोवा बनावटीची दारू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, पथकाने किनळे माऊली मंदिर स्टॉप नजीकच्या मुख्य रस्त्यावर सापळा रचला.
सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास संशयित बलेनो गाडी (क्रमांक MH07/AG/9737) थांबवून तपासणी केली असता, गाडीत विविध ब्रँडची ५४ बॉक्स दारू आढळून आली. या दारूची किंमत अंदाजे ३ लाख ५६ हजार रुपये आहे. पोलिसांनी दारूसह ८ लाख रुपये किमतीची बलेनो गाडीही जप्त केली. दोन्ही जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत ११ लाख ५६ हजार रुपये आहे.
या प्रकरणी बसत्याव घोन्सालवीस उर्फ बंटी (रा. होडावडा, ता. वेंगुर्ला) आणि आजू उर्फ तुकाराम नाईक (रा. किनळे, ता. सावंतवाडी) या दोघांना ताब्यात घेत सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक (ASI) महेश अरवारी करत आहेत.