
सावंतवाडी : शिक्षक आमदार मतदार संघाची निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. त्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती कोकण विभागाचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी दिली. कोकण विभागीय शिक्षक आमदार मतदार संघासाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे. आपण सहा वर्षे या मतदारसंघात काम केले. सर्वांनी सहकार्यही दिले. शिक्षक त्यांच्या समस्या, अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न केले आहेत. आता येत्या आठवड्याभरात या मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होणार आहे आणि फेब्रुवारीमध्ये निवडणूक प्रक्रिया होईल, तेव्हा पुन्हा आपण मला सहकार्य करावे, असे आमदार बाळाराम पाटील यांनी स्पष्ट केले.
दहावी, बारावी नंतरचे शिक्षण व शिक्षण विभागातील अध्यादेश आदि माहिती संदर्भात 'ज्ञानज्योती' हे पुस्तक प्रकाशन यावेळी करण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक माध्यमिक शाळेला हे पुस्तक मोफत स्वरूपात दिले जाणार आहे. जेणेकरून शिक्षकांना शिक्षण विभागातील माहिती व विविध अडचणी संदर्भात शिक्षण विभागाच्या योजनांची माहिती मिळणार आहे, असेही आ. पाटील म्हणाले.
कोरोना महामारीचे संकट चीनमध्ये आले आहे. मात्र भारतात या संदर्भात मोठा धोका सद्य:स्थितीत नाही. राज्यशासन कोरोनाची ही लाट झोपवण्याच्या दृष्टीने सतर्क झाले आहे. बूस्टर डोस सर्वांना देऊन उपाययोजना करणार आहे. तिसऱ्या लाटे वेळी शासन सतर्क झाले, त्याप्रमाणे आताही होणार आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या सर्व दहावी, बारावी व सर्व परीक्षा वेळेत होतील. तसेच शाळा बंदही होणार नाहीत, त्यामुळे पालक, शिक्षक तसेच विद्यार्थी यांनी करोनाबाबत कोणतीही भीती बाळगू नये. मात्र सतर्कता बाळगावी व स्वतःची काळजी घ्यावी, असेही आ. पाटील म्हणाले.
यावेळी सहविचार सभेत त्यांनी हिवाळी अधिवेशनात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी अघोषित व विनाअनुदानित शाळा व वाढीव २० टक्के शाळांना मोठे पॅकेज दिले आहे. येत्या काळात महाराष्ट्रातील शाळांना सदर अनुदान मिळणार आहे. तसेच तीस हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शिक्षकांच्या समस्या अडचणीबाबत विकास सावंत व श्री सराफदार यांनी प्रश्न मांडले. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पोर्टल शिक्षक भरती बाबतची भूमिका घेतली आहे. त्याबाबत विकास सावंत यांनी नाराजी व्यक्त केली.
फोटो : सावंतवाडी येथे शिक्षक आमदार बाळाराम पाटील 'ज्ञानज्योती' पुस्तकाचे प्रकाशन करताना. बाजूला विकास सावंत, काका मांजरेकर,