
मंडणगड : लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागाच्यावतीने क्रंतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यातिथी साजरी करण्यात आली. या निमीत्ताने आय़ोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव होते. यावेळी सांस्कृतिक विभागाचे समन्वयक डॉ. विष्णू जायभाये, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. संगीता घाडगे, डॉ. अशोक साळुंखे, डॉ. भरतकुमार सोलापुरे, डॉ. ज्योती पेठकर, डॉ. धनपाल कांबळे, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विष्णू जायभाये यांनी केले.
यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी बोलताना प्राचार्य डॉ. राहूल जाधव म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी भारतामध्ये स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली. स्त्री शिक्षणातील कार्य त्यांचे उल्लेखनीय स्वरूपाचे आहे. सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला. स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. त्यांचे शैक्षणिक कार्य पाहून 1852 साली ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळेला सरकारी अनुदानाही देवू केले. त्यांच्या कार्याचा आदर्श पुण्यतिथीपुरता मर्यादित न राहता तो आयुष्यभर आपण सर्वांनी आचरणात आणला पाहिजेत, तरच ख-या अर्थाने त्यांची पुण्यतिथी साजरी केल्याचे सार्थक झाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. विष्णू जायभाये यांनी मानले.