
सिंधुदुर्गनगरी : मान्सूनपूर्व पावसाने सिंधुदुर्गची राजधानी असलेल्या सिंधुदुर्गनगरीला आज अक्षरश: झोडपले. अचानक वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे सिंधुदुर्गनगरीतील सर्वच रस्त्यांवर मोठमोठी झाडे पडून सर्व रस्ते बंद झाले. यामुळे सायंकाळी कार्यालयातून सुटून घरी जाणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे मात्र प्रचंड हाल झाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आणि गावांमध्ये हा पाऊस पडत नसला, तरीही काही काही भागांमध्ये हा पाऊस पडत आहे. बुधवारी सायंकाळी 5 ते 5:30 वाजण्याच्या सुमारास सिंधुदुर्गनगरीमध्ये वादळी वाऱ्यासह ढगफुटीप्रमाणे पाऊस कोसळला. यामुळे या परिसरातील कित्येक झाडे मोडून पडली. तर बऱ्याच इमारतींवरील पत्र्याच्या शेड वादळामुळे खाली कोसळल्या. सिंधुदुर्गनगरी मधील सर्वच रस्त्यांवर झाडे पडल्याने सर्व रस्ते बंद झाले होते. यामुळे कार्यालये सुटल्यानंतर आपापल्या घरी जाण्यासाठी निघालेल्या कर्मचाऱ्यांचे मात्र प्रचंड हाल झाले.
सिंधुदुर्गनगरीत कोसळलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी झाडे वीज वाहिन्यांवर पडल्याने वीज वाहिन्या तुटून रस्त्यावर कोसळल्या आहेत. त्यामुळे या नगरीतील विद्युत पुरवठाही खंडित झाला आहे.