नरेंद्र डोंगरावर वृक्षारोपण..!

Edited by: विनायक गावस
Published on: July 31, 2023 12:52 PM
views 265  views

सावंतवाडी :  'जागतिक व्याघ्र दिन' व सन 2023 च्या पावसाळ्यात राबविण्यात येणारा 'वनमहोत्सव' यांचे निमित्ताने सावंतवाडी वन विभागाकडून नरेंद्र डोंगरावर 'वड' झाडाच्या रोपांची लागवड करण्यात आली. या वृक्षारोपणासाठी सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर व सावंतवाडी परिक्षेत्र कार्यालयाचा स्टाफ उपस्थित होता.

वन विभागाकडून नरेंद्र डोंगर येथे मोठ्या प्रमाणावर वड प्रजातीच्या रोपांची लगवड करण्यात आली. वड झाडाचे धार्मिक महत्त्व तसेच पर्यावरणीय उपयुक्तता पाहता ही वृक्षलागवड वन विभागामार्फत राबविण्यात आली. वड झाडाला अक्षयवृक्ष देखील म्हंटले जाते. कारण हा वृक्ष आपल्या परंब्यापासून त्याचा विस्तार वाढवत जातो ज्यामुळे याला कधीच क्षय नाही. तसेच या वडाला हिंदू धर्मासोबतच जैन व बौद्ध धर्मात देखील पूजनीय मानले जाते. आयुर्वेदात देखील पोटांच्या आजारांवर याच्या सालीच्या रसाचा औषध म्हणून उपयोग केला जातो. या झाडाला येणाऱ्या फळांना कित्येक प्रजातींचे पक्षी व प्राणी आवडीने खातात. हॉर्नबील, सुतारपक्षी, हरियाल, तांबट इत्यादी पक्षी आवडीने फळे खातात. तसेच शेकरू, माकड, वानर, सांबर, इत्यादी वन्यजीव याच्या फळांवर तसेच कोवळ्या कोंबांवर, सालीवर गुजराण करतात. 

वडाच्या या विलक्षण उपयुक्ततेमुळे मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर रामानुजम यांचे संकल्पनेतून, सावंतवाडी वन विभागामार्फत उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांचे हस्ते वड प्रजातींचे वृक्षारोपण नरेंद्र डोंगरावर करण्यात आले. सावंतवाडी वन विभागामार्फत सर्व सुजाण नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, या 'वड प्रजाती संवर्धन उपक्रमा'मध्ये आपण आपल्या आवारामध्ये कमीत कमी एक वडाचे झाड अथवा वडाची फांदी लावून त्याचे संगोपन करावे.