
देवगड : भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवेगार आणि निरोगी जग निर्माण करण्यासाठी जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेचा पर्यावरण संरक्षणाचा अभिनव संकल्प.वृक्ष दिनाचे औचित्य साधून प्रशालेने वृक्षारोपण केले. वृक्षारोपण करून पर्यावरणाचे रक्षण करणे व विद्यार्थ्यांमध्ये झाडाचे महत्व पटवून देणे या उद्देशाने दरवर्षी महाराष्ट्रात १ जुलै हा दिवस वृक्ष दिन म्हणून साजरा केला जातो.
वृक्ष हवामानात समतोल राखतात, हवेतून कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतात व प्राणवायू सोडतात.झाडे धूळ , धूर आणि आवाज यांचे प्रमाण कमी करतात.वृक्षामुळे वायुमंडळात आर्द्रता वाढते, ज्यामुळे पाऊस पडतो.झाडांमुळे पक्षी , प्राणी आणि कीटक यांना निवासस्थान मिळते.या जैवविविधतेच्या रक्षणाबरोबरच वृक्ष मातीची धूप थांबवतात.अशा प्रकारचे वृक्ष दिनाचे महत्व प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
आज लावलेली झाडे उद्याची हिरवीगार संपत्ती ठरणार आहे.त्यासाठी सर्वांनी आपल्या घराजवळ वृक्षारोपण करावे, लावलेले झाड जोपासावे त्याची काळजी घ्यावी व लोकांमध्ये जागरूकता निर्माण करावी असे आवाहन मुख्याध्यापक.सुनील जाधव यांनी केले. याप्रसंगी पराग हिरनाईक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वृक्ष दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण झाली असून लावलेली झाडे जगवण्याचा निर्धार सर्व विद्यार्थ्यानी व्यक्त केला.