दोडामार्ग म्हावळणकरवाडीत विजेच्या खांबावर पडले झाड

Edited by: लवू परब
Published on: May 22, 2025 15:53 PM
views 114  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात चार दिवस सुरु असलेल्या अवकाळी मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. तालुक्यातील काही गावात गेल्या दोन दिवसांपासून बत्तीगुल झालीय. शहरातील म्हावळणकरवाडी येथे झाडे मोडून रस्त्यावर व विजेच्या खांबावर पडली. त्यामुळे शहरातील ही लाईट सकाळपासून गेली होती. अवकाळी पावसात विजेची ही परिस्थिती तर ऐन पावसाळ्यात काय होणार? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय. त्यामुळे वीज महावितरणने विद्युत लाईनवरी  झाडे झूडपे तोडून साफ करावी अशी मागणी जनतेमधून केली जातेय.

चार दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे दोडामार्ग शहरासहित इतर ठिकाणी विद्युत विजेचा फटका नागरिकांना बसला आहे. तालुक्यातील झरेबांबर, भेडशी, आयनोडे पुनर्वसन आदी भागात गेल्या तीन दिवसांपासून लाईट नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. भेडशी व दोडामार्ग शहरात सकाळ पासून लाईट नसल्याने व्यापारी वर्गाची मोठी तारांबळ उडाली आहे. आयस्क्रीम पार्लर व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारी कार्यालयात लाईट नसल्याने इन्व्हर्टर देखील बंद झाल्यामुळे कामाकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे तालुका कार्यालयात आलेल्या नागरिकांना काम होण्याआधीच परतून जावे लागले. बऱ्याच जणांचे चार्ज संपल्यामुळे मोबाईल देखील बंद झाले आहेत. त्यामुळे नातेवाईक व इतर कामासाठी होणारा संपर्क बंद झाल्याने दोडामार्ग मधील जनतेची मोठी तारांबळ उडाली आहे. त्यामुळे या गोष्टीचा विजवितरण विभागाने विचार करून दोडामार्ग मधील विजेचा प्रश्न त्तकाळ सोडवावा अशी मागणी जनतेमधून करण्यात येत आहे.