
देवगड : देवगड एसटी आगाराच्या सुशोभीकरण कामातील कथित अनियमितता आणि निकृष्ट दर्जाच्या कामांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ३१ मे रोजी देवगड एसटी आगाराला भेट देऊन सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. देवगड पंचायत समिती उपसभापती अमोल लोके यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर ही पाहणी निश्चित झाल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे मानले जात आहे.
देवगड एसटी आगाराच्या सुशोभीकरणासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून विविध विकासकामे सुरू आहेत. मात्र काही कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर उपसभापती अमोल लोके यांनी आगाराला भेट देत संबंधित बाबी एसटी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यावेळी एसटी प्रशासनाने आवश्यक सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र, कामांची प्रत्यक्ष स्थिती आणि तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन उपसभापती लोके यांनी ही बाब परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यानंतर राज्यातील विविध एसटी आगारांमधील समस्या आणि विकासकामांचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश परिवहन मंत्र्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना दिले.
त्या अनुषंगाने शिवसेना संपर्कप्रमुख बाळा चिंदरकर, यांनी देवगड एसटी आगाराला भेट देत सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी केली. यावेळी उपसभापती अमोल लोके, जिल्हा पदाधिकारी संदेश पटेल तसेच देवगड-जामसंडे नगराध्यक्षा साक्षी प्रभू आदी उपस्थित होते. राज्यातील विविध आगारांचे अहवाल परिवहन मंत्र्यांकडे सादर करण्यात आल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक स्वतः देवगड आगारात येऊन सुरू असलेल्या कामांचा दर्जा, निधीचा वापर आणि तक्रारींची सत्यता तपासणार आहेत.
सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेले परिवहन मंत्री उद्या दुपारी १ वाजता देवगड एसटी आगारात दाखल होणार असून सुशोभीकरणाच्या कामांची पाहणी करणार आहेत. अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख तथा देवगड पंचायत समिती उपसभापती अमोल लोके यांनी दिली.










