
सिंधुदुर्गनगरी : गणेशोत्सव काळात वाढणारी प्रवाशांची गर्दी आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन सर्व नियोजन करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश होते. या अनुषंगाने आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, वाहतूक पोलीस निरीक्षक श्री. नलावडे, मोटार वाहन निरीक्षक श्री. भोसले, श्री. पोलादे, श्री. ढोबळे, श्री. चव्हाण, श्री. ठोंबरे तसेच विभागातील अन्य अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत नुकत्याच झालेल्या बदली व नियुक्तींनंतर अधिकाऱ्यांचे तालुका निहाय जबाबदाऱ्या नव्याने पुनर्वाटप करण्यात आले. परिवहन विभाग व वाहतूक पोलीस यांच्यात परस्पर समन्वय ठेवून काम करण्यावर भर देण्यात आला.
मुंबई-पुणे मार्गावरून मोठ्या संख्येने भाविक सिंधुदुर्गात दाखल होत असल्याने बसेसमुळे निर्माण होणाऱ्या कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी एसटी विभागाला आवश्यक सूचना करण्यात आल्या. अतिरिक्त वाहनांमुळे महामार्गावर आणि तालुका मुख्यालयाशी जोडणाऱ्या रस्त्यांवर वाहतुकीचे नियोजन काटेकोरपणे करावे, असे आदेश सर्व निरीक्षकांना देण्यात आले. तसेच आपत्कालीन वाहनांच्या उपलब्धतेचाही आढावा घेण्यात आला.
रेल्वेमार्गे येणाऱ्या प्रवाशांसाठी नव्याने रिक्षा थांबे मंजूर करण्यात आले असून, रिक्षा संदर्भातील मदत व तक्रारींसाठी हेल्पलाइन क्रमांक रेल्वे स्थानकांवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्ह्याच्या प्रवेशद्वारांवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत स्वागत कक्ष तर आरोग्य विभागामार्फत मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत.
विविध परिवहन संघटनांच्या माध्यमातून रिक्षा चालक व बस चालक यांना प्रवाशांशी सौजन्यपूर्ण वर्तन करण्याचे आदेश देण्यात आले. शहरांमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
यावेळी नागरिकांनाही आवाहन करण्यात आले की, वाहन चालकांनी वाहन चालवताना काळजी घ्यावी, नो पार्किंग क्षेत्रात वाहन उभे करू नयेत, पावसामुळे दृश्यमानता कमी असल्यास सावकाश वाहन चालवावे, घाट रस्ते व नागमोडी वळणांवर योग्य वेग राखावा.
गणेशोत्सव काळात सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक व्यवस्थेसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, नागरिकांनीही नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.