माजगाव कासरवाडा इथं फांद्या रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा

Edited by: विनायक गांवस
Published on: April 27, 2026 21:16 PM
views 22  views

*सावंतवाडी :* जुना मुंबई-गोवा महामार्गावर माजगाव कासरवाडा येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या झाडाच्या फांद्या अचानक रस्त्याच्या मधोमध आल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे या मार्गावरील वाहनचालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून वनविभागाने याची तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.


माजगाव कासरवाडा परिसरातील या महामार्गावर अचानक झाडाच्या फांद्या झुकल्याने रस्ता अर्ध्याहून अधिक व्यापला गेला आहे. हा मार्ग वर्दळीचा असल्याने, विशेषतः दुचाकी आणि अवजड वाहनांना येथून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी या फांद्यांचा अंदाज न आल्यास गंभीर अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. सध्या या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असून वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन, रस्त्यावर आलेल्या या फांद्या तात्काळ हटवाव्यात आणि वाहतूक सुरळीत करावी, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमधून केली जात आहे.