
वैभववाडी : आविष्कार फाऊंडेशन इंडिया या संस्थेकडून सन २०२५-२६ च्या राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने कुसूर येथील शिक्षक सुरेंद्र साळुंखे यांना गौरविण्यात आल. मालवण येथे हा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला.
श्री साळुंखे हे प्राथमिक शिक्षक आहेत. सध्या ते सोनाळी केंद्रशाळा येथे कार्यरत आहेत. गेली अनेक वर्षे त्यांनी तालुक्यातील विविध शाळांमध्ये अध्ययनाच काम केले आहे. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांची आविष्कार फाऊंडेशनने पुरस्कारासाठी निवड केली. मान्यवरांच्या उपस्थित हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अविष्कार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार, ज्येष्ठ साहित्यिक किसनराव कु-हाडे, सेवानिवृत्त लेखापाल काशीनाथ जाधव, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, एम. डी. देसाई, शिलू गोसावी, आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारताना श्री साळुंखे यांनी संस्थेचे तसेच मार्गदर्शक, सहकारी शिक्षक, विद्यार्थी, पालक व कुटुंबियांचे आभार मानले. हा पुरस्कार माझ्या जबाबदारीत अधिक वाढ करणारा असून भविष्यातही अधिक जोमाने कार्यरत राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










