कसाल ग्रामपंचायतीत एस.टी. सवलत पास - स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: April 27, 2026 21:18 PM
views 55  views

सिंधुदुर्गनगरी : कसाल ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून गावातील नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) विविध सवलतींचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष “सवलत पास व स्मार्ट कार्ड” नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सरपंच राजन परब, ग्रामपंचायत कसाल तसेच ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्र कसाल यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

हे शिबिर शनिवार, दिनांक २ मे २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत ग्रामपंचायत सभागृह, कसाल येथे पार पडणार आहे.

या शिबिरामध्ये ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एस.टी. प्रवासात ५० टक्के सवलतीसाठी स्मार्ट कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच ७५ वर्षांवरील “अमृत ज्येष्ठ नागरिक” लाभार्थ्यांना पूर्णपणे मोफत प्रवासासाठी “अमृत कार्ड” देण्यात येणार आहे. याशिवाय राज्य परिवहन मंडळाच्या नियमानुसार इतर विविध सवलत पासचीही सुविधा नागरिकांना मिळणार आहे.

नोंदणीसाठी आधार कार्ड व मोबाईल क्रमांक आवश्यक असून नवीन स्मार्ट कार्डसाठी शासनाकडून १९९ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. गावातील जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी व महिला भगिनींनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच राजन परब यांनी केले आहे.