तळेबाजारमधील वाहतूक कोंडी जैसे थे

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 22, 2025 16:33 PM
views 135  views

देवगड : देवगड -निपाणी महामार्गावरील देवगड-जामसंडे-तळेबाजार शहरात अतिक्रमणाची परिस्थिती जैसे थे असून देवगड - निपाणी मार्गावरील देवगड जामसंडे तळेबाजार येथील वाहतूक कोंडी हा रोजचाच प्रश्न बनलाय.

देवगड-जामसंडे-तळेबाजार शहरात त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडतोय. मे महिन्यात मोठ्या प्रमाणात चाकरमानी  दाखल झाले आहेत. मात्र देवगड जामसंडे तळेबाजार येथे वारंवार वाहतूक कोंडी होत असून याचा फटका एसटी सह अन्य प्रवाशांना सोसावा लागत आहे. त्यामुळे देवगड येथे वाहतुकीचा मोठा बोजवारा उडाला असून या सर्व शहरात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. वाहन पार्किंगची व्यवस्था नसल्याने हा प्रश्न निर्माण होत आहे. वाहन पार्किंगचा विषय गंभीर बनत चालला असून अतिक्रमणाची परिस्थिती जैसे थे आहे. वाहतूक कोंडी हा रोजचा प्रश्न बनल्याने वाहन चालकही आता यावर काहीही बोलायला तयार नाहीत. शहरातील मुख्य रस्त्यांवर मधोमध वाहने पार्किंग केली जात असल्याने वाहतूक समस्येतून लवकर सुटका होण्याची शक्यता दिसत नाही. मुख्य रस्त्यावर वाहने पार्किंग करण्याची स्पर्धा देवगड जामसंडे शहरात पाहायला मिळत आहे.

देवगड आगारात प्रवेश करण्याच्या मुख्य मार्गावर चारचाकी वाहने उभे करण्याचे प्रकार वाढले असल्याने देवगड जामसंडे तळेबाजार येथे वाहतूक कोंडी वारंवार होत असल्याने प्रसंगी परतीच्या प्रवासावरून आगारात येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना गाड्या रस्त्यात उभ्या करून प्रवाशांना रस्त्यात उतरवावे लागत आहे. याकडे गांभीर्याने पहाणे गरजेचे असून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी महत्वाची जबाबदारी पार पाडावी. प्रसंगी चुकीच्या पद्धतीने वाहन पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

सध्या देवगड मध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असली तरी बाजारातील गर्दी कमी होत नाही. सकाळी आणि सायंकाळी शहरात वाहतूक कोंडी होत आहे. मे महिन्यात अनेक पर्यटक देवगड मध्ये दाखल झालेत. मात्र इतर दिवशी शहरात वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. शहरातील बहुतांश रस्त्यावर बेशिस्त वाहन पार्किंग अशा गोष्टींमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता पार्किंगची व्यवस्था ही वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.