वाहतूक कोंडी - स्वच्छतेची समस्या सोडवा : उमेश येरम

वेंगुर्ला मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांना निवेदन
Edited by: दिपेश परब
Published on: July 02, 2024 14:12 PM
views 140  views

वेंगुर्ले : वेंगुर्ला शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडी व स्वच्छतेची समस्यांचे निराकरण करण्यासंदर्भात शिवसेनेच्या माध्यमातून वेंगुर्ले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांची भेट घेऊन लेखी निवेदन देऊन लक्ष घेतले आहे. 

    शिवसेना वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम यांनी मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांना सादर केलेल्या निवेदनात, वेंगुर्ला बाजारपेठेतील पार्किंग व्यवस्था नियोजनबध्द नसल्याने अनेक वेळा वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे समस्त व्यापारी वर्गाला व बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तरी आपण बाजारपेठेतील पार्किंग व्यवस्था सुव्यवस्थित करुन पार्किंगचे योग्य नियोजन करण्याबाबत निर्णय घ्यावा. तसेच शहरात व बाजारपेठेत भटक्या मोकाट जनावरांचा त्रास व्यापारी, वाहने, पादचारी यांना होत आहे. त्यांचाही विशिष्ट उपायोजना करून बंदोबस्त करावा. पावसाळा सुरु झालेला असून शहरामध्ये डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. डासांमुळे नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. डासांमुळे आजार पसरण्याची शक्यता असून ते नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. सबब संपूर्ण शहरामध्ये लवकरात लवकर डासनाशक फवारणी करणे तसेच पावसाळ्याचे सुरुवातीचे दिवस असल्याने विहीरीचे पाणी गढूळ झालेले आहे. अशुध्द पाणी पिल्याने देखील मानवी आरोग्य धोक्यात येऊ शकते. म्हणून विहीरीमधील पाणी स्वच्छ व शुध्द होण्यासाठी नगरपालिकेमार्फत संबंधीत औषधे विहीरीमध्ये टाकावीत. विहिरीत औषध  टाकणे व डास फवारणी मोहीम करण्यापूर्वी नागरिकांना त्याची पूर्व कल्पना द्यावी जेणेकरून व्यवस्थितपणे त्याची अंमलबजावणी होईल.

   वेंगुर्ला शहरात पावसाळ्यात भेडसावणारी महत्वाची समस्या म्हणजे वारंवार लाईट जाणे. या समस्येमुळे नागरिकांना शारिरीक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. काही परिसरातील झाडे पडल्यामुळे कित्येक वेळा लाईट व्यवस्था पुर्ववत होण्याकरीता तीन ते चार दिवस देखील जातात. पावसाळ्यात लाईट व्यवस्था सुरळीत राहण्याकरीता लाईट लाईनला लागून असलेली धोकादायक झाडे आहेत त्यांची त्वरीत तोड करण्यात यावी.

     कित्येकदा पावसाळ्यामध्ये ही धोकादायक झाडे पडल्यामुळे मानवी जिवीतास देखील हानी पोहोचू शकते. सबब नगरपालिकेमार्फत अशी धोकादायक झाडे त्वरीत तोडण्यात यावीत. शहरातील विविध भागांमध्ये सध्या गटार सफाईचे काम सुरु आहे. परंतू ते काम योग्य रितीने होत नसल्याबाबत अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. या समस्येकडे नगरपालिकेने विशेष लक्ष देऊन त्या भागातील नागरिकांचे समाधान होईल असे समाधानपूर्वक काम करणे.

    शहरामध्ये ज्या-ज्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय आहेत त्या ठिकाणी कमोड शौचालयाची व्यवस्था करावी. तसेच शौचालयामधील लाईट व पाणी व्यवस्थेकडे गांभिर्याने लक्ष द्यावे.

   आतापर्यंत दिपक केसरकर यांनी आपल्या वेंगुर्ला शहरातील विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. त्यांचे सहकार्य कायमच वेंगुर्ला शहराला लाभलेले आहे. तरी वरील समस्यांचे निराकरण होण्याकरीता व ही विकास कामे पूर्णत्वास नेण्याकरीता लागणारा निधी आम्ही दिपक केसरकर यांच्या माध्यमातून आपणास उपलब्ध करुन देऊ. आपण आम्ही केलेल्या सूचना तात्काळ पूर्ण करण्यात याव्यात. अशी मागणी करण्यात आली

   यावेळी युवासेना शहर प्रमुख संतोष परब, महिला आघाडी प्रमुख अँड.श्रद्धा बाविस्कर, महिला आघाडी उपशहर प्रमुख मनाली परब, प्राची परब, राजू परब, संजय परब, देविदास वालावलकर, बाळा परब, जयेश गावडे, संदिप गावडे, मनिष रेवणकर, अतुल केरकर, सुरेश कांबळी, सदानंद पांजरी, स्वप्नील पांजरी, विजय गावडे आदींचा समावेश होता.