पर्यावरणातून पर्यटन..!

जागतिक पर्यटन दिन विशेष
Edited by:
Published on: June 05, 2025 12:25 PM
views 246  views

वरिष्‍ठ उपसंपादक स्‍वप्‍निल परब यांचा खास लेख 

सभोवताली हिरवा निसर्ग...ऋतू हिरवा, अन्‌ बरवा! याच सृष्‍टीसौंदर्याच्‍या मखमली शालूवर जेव्‍हा मन अलगद बागडू लागते, त्‍यावेळी कळते पर्यावरण हा आपला श्‍वास, आपल्‍या जगण्‍याचा ध्‍यास, अर्थात पर्यावरण सजीव सृष्‍टीचा आल्‍हाददायी रंगमंच. मित्रहो, आज ५ जून जागतिक पर्यावरण दिन, असं म्‍हणतात, ‘कोकणची माणसा साधी भोळी, काळजात त्‍यांच्‍या भरली शहाळी’, कोकणच्‍या माणसाचे हे काळीज पर्यावरणाने एवढे प्रगल्‍भ केलंय, की याच डोंगरदर्‍यांत लपलेल्‍या खेड्यांचे सौंदर्य येथे येणार्‍या प्रत्‍येकाच्‍या काळजात भरते. पर्यावरणातून समृद्धी साधताना हरितप्रकल्‍पांना प्राधान्‍य देत सिंधुदुर्गने पर्यावरणाला प्राधान्‍य देत, ‘पर्यावरणातून पर्यटन’ असे मार्गक्रमण सुरू केले आहे. विशेष आनंदाची बाब म्‍हणजे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनआच्छादनात २९.३७ चौ मीटर ने मागील दहा वर्षांच्या तुलनेत वाढ झाली आहे. जिल्‍ह्यातील जैवविविधता टिकवितानाच केंद्रसरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील २५ गावे पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील घोषित केली. त्‍यामुळे भविष्‍यात सिंधुदुर्गची वाटचाल हरित पर्यटनाच्‍या दृष्‍टीने सुरू आहे. 

पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा  करण्यामागचा मुख्य हेतू आहे. वास्‍तविक पर्यावरण हा आपल्‍याचा जगण्‍याचा स्‍त्रोत आहे. त्‍यामुळे पर्यावरणाला बाधक जल, वायू, ध्‍वनी प्रदूषणावर सर्वंकष उपाययोजना काढत पर्यावरणाचा काही ठिकाणी होत असलेला र्‍हास थोपविणे प्रत्‍येकाचे आद्य कर्तव्‍य आहे. विकासाच्‍या नावाखाली होत असलेली जंगलतोड पर्यावरणास घातक असली तरी, पर्यावरणाचे संतुलन राखत अशा प्रकारचे प्रकल्‍प, आस्‍थापने, बांधकामे येथे व्‍हायला हवीत. सिंधुदुर्गच्‍या बाबतीत एक गोष्‍ट खरी, की पर्यावरणाला केंद्रबिंदू ठेवून पर्यावरणातून पर्यटन आणि पर्यटनातून रोजगार निर्मितीचे स्‍वप्‍न पालकमंत्री नितेश राणे बाळगून आहे. त्‍याचे एक उत्तम उदाहरण म्‍हणजे, सागरी पर्यटन प्रकल्‍प! सिंधुदुर्गातील पर्यटनाच्या अगणित संधी विचारात घेऊनच सरकारने सिंधुदुर्ग सागरी पर्यटन प्रकल्पाची संकल्पना ही जिल्ह्याच्या पर्यटन क्षमतेच्या विस्ताराला केंद्रस्थानी ठेवूनच मांडली आहे. पाण्याखालचे संग्रहालय अर्थात अंडरवॉटर म्युझियम, कृत्रिम प्रशीर (आर्टिफिशियल रीफ) आणि पाणबुडी पर्यटन यांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण योजना त्यादृष्टीनेच आखल्या गेल्या आहेत. सिंधुदुर्ग सागरी पर्यटन प्रकल्प पर्यावरणस्नेही पद्धतीनेच राबवला जाणार आहे. सागरी जैविक परिसंस्थेचे संरक्षण आणि जैवविविधतेला संवर्धन करणे ही या प्रकल्पाअंतर्गची महत्त्वाचे उद्दिष्टे आहेत. इतकेच नाही तर गोव्यातून सिंधुदुर्गपर्यंत एक सुसंगत पर्यटन मार्ग तयार करण्याची कल्पनाही या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष साकारण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मागील दहा वर्षांतील वनआच्छादन हे १.२८१.९३ चौ. किमी होते  तर सध्या हे वनआच्छादन १.३११.३० चौ.किमी  एवढे आहे. यात तब्बल २९. चौ. किमी ची वाढ झाली आहे. तर पश्चिम घाटातील घनदाट वन आच्छादनामध्ये गेल्या दहा वर्षांत वाढ झाली असली तरी, मध्यम आणि खुल्या स्वरुपाच्या जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याने एकूणच वनक्षेत्रामध्ये ५८.२२ चौ. किमीने घट झाल्याचे दिसून येत आहे. पश्चिम घाट हा १ लाख, ४० हजार चौ. किमी भौगोलिक क्षेत्रावर विस्तारलेला आहे. त्याचा विस्तार गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या सहा राज्यांमध्ये आहे. २०१२ साली पश्चिम घाटाला 'युनेस्को' चा जागतिक वारसास्थळाचा दर्जा देखील मिळाला आहे. असे असले तरी सह्याद्री च्या वनआच्छादनात दिवसेंदिवस होणारी घट ही चिंतेची बाब आहे. मात्र दुसरीकडे सह्याद्रीच्या पट्ट्यात येणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनआच्छादनात मागील दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, ही जिल्‍ह्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी दिलासादायक बाब म्‍हणावी लागेल. 

पर्यावरण हाच कोकणचा आत्‍मा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जैवविविधतेमध्ये अचंबित करणारी नैसर्गिकता आहे. जिल्ह्यात ३५० औषधी वनस्पती, ११३ रंग देणाऱ्या वनस्पती, शंभर अतिदुर्मिळ वनस्पती तसेच १०० ते १५० वनस्पतींचा रानभाज्या म्हणून ग्रामीण जनतेच्या अविभाज्य भाग आहेत. त्‍यातून रोजगारनिर्मिती तर आहेच पण त्‍यामुळे येथील प्रदेशाची एक वेगळी ओळख आहे. यावर्षीचा जागतिक पर्यावरण दिन हा 'जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन' या संकल्पनेंतर्गत साजरा करण्यात येत आहे. त्‍यामुळे प्‍लास्‍टिक निर्मूलन, स्‍वच्‍छतेवर भर देत पर्यावरणाला एक वेगळा आयाम देण्‍याची गरज आहे. 

पर्यावरणाचे संतुलन विस्कळीत झाल्यामुळे व मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्यामुळे जंगलातील हिंसक पशु शहरांकडे शिरकाव करतांना दिसतात. यामुळे मानवीय हानी मोठ्या प्रमाणात होतांना आपण पहातो. यामुळेच मानव व पशु यांच्यात शत्रुत्वाची भावना निर्माण झाली आहे. आज प्रदुषणामुळे अनेक पशु-पक्षी लुप्त झाल्याचे दिसून येते."गिधाड हा पक्षी" पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून एक महत्त्वाचा घटक आहे. परंतु प्रदूषणामुळे गिधाडांची संख्या कमी झाल्याचे दिसून येते. अशाप्रकारे अनेक पशु-पक्षांना प्रदूषणामुळे आपले प्राणसुध्दा गमवावे लागतात. पर्यावरणाला वाढविण्याकरिता मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याची गरज आहे. वाढते शहरीकरण व औद्योगिकीकरण यांना कुठेतरी अंकुश लावला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व्हायला पाहिजे.आज प्रदुषणामुळे व ग्लोबल वॉर्मिगमुळे मोठ्या प्रमाणात ग्लेशिअर वितळत आहे, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढतच आहे, हे सर्व थोपवू शकते, पर्यावरण! त्‍यामुळे त्‍याला वाचविण्‍याची जबाबदारी आपली आहे.