पालकमंत्र्यांच्या हस्ते पर्यटन लोगोचे अनावरण

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 27, 2024 14:01 PM
views 129  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढावी, पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी शासनातर्फे प्रयत्न केल्या जातात. याचाच एक भाग म्हणून केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने 'स्वदेश दर्शन २.०' उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष लोगोचे अनावरण पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, माजी आमदार राजन तेली, प्रभाकर सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने 'स्वदेश दर्शन २.०' योजनेअंतर्गत देशातील ५७ पर्यटन स्थळांची निवड करण्यात आलेली आहे. राज्यातून सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.   या योजने अंतर्गत जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यात येणार आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने जिल्ह्यात  नेमून दिलेल्या पथकामार्फत अभ्यास केल्या जात आहे.  टूर ऑपरेटर, पर्यटक गाईड्स, ट्रॅव्हल एजन्ट आणि पर्यटन उद्योगातील इतर भागधारक यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून  घेऊन त्यांचे निराकरण करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.     स्वदेश दर्शन 2.0 या योजनेअंतर्गत जिल्यातील पर्यटनाशी निगडित कामांसाठी एक लोगो एक टॅगलाइन निश्चित केलेली आहे.