पर्यटन दिनी स्व. डि. के. सावंत यांचे स्मरण..!

Edited by: विनायक गावस
Published on: September 28, 2023 12:36 PM
views 108  views

सावंतवाडी : निसर्गाने भरभरून दिलेला हा निसर्ग संपन्न सिंधुदुर्ग जिल्हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून १९९७ मध्ये जाहीर झाला. गेल्या सुमारे पंचवीस वर्षाचा मागोवा घेतल्यास अपेक्षेनुसार या क्षेत्रात संधी असतानाही विकास झालेला नाही. मात्र, या क्षेत्रातील संधी आणि आव्हाने याचा विचार करून खऱ्या अर्थाने काम कुणी केल असेल तर ते म्हणजे स्व. डि. के. सावंत यांनी असं मत अँड.‌ नकुल पार्सेकर यांनी व्यक्त केले. ‌

जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून पर्यटन व्यवसायिक महासंघ व डि. के. सावंत मिञमंडळाने डि. कें च्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी डि. के. रेसिडेन्सी माजगाव येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.

सुरवातीला डि. के. सावंत यांच्या धर्मपत्नी श्रीमती शिवांगी सावंत व त्यांची सुकन्या कु. शिवप्रिया यांनी डि के. च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.  पर्यटन व्यवसायिक महासंघ सिंधुदुर्गचे सचिव अॅड. नकुल पार्सेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात डि. के. म्हणजे या जिल्ह्यातील पर्यटन चळवळीतीचा श्वास होते. खऱ्या अर्थाने त्यांनी पर्यटनाची ओळख करून दिली. देश विदेशात कमी खर्चात सहलींचे आयोजन करुन अनेक मध्यमवर्गीयांना पर्यटनाचा आनंद मिळवून दिला. शासनस्तरावर कधी जागतिक पर्यटन दिन साजरा झाल्याचे ऐकिवात नाही मात्र त्यांच्या हयातीत सातत्याने ते स्वखर्चाने प्रत्येक वर्षी जागतिक पर्यटन दिनाच्या सोहळ्याचे भव्यदिव्य असे आयोजन करत असत. दुर्धर आजार आणि कोराना  महामारीत ही त्यांची परंपरा खंडीत झाली. 

यावेळी व्यापारी संघाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते नंदन वेंगुर्लेकर यांनी डि. के. चे जिल्ह्यातील पर्यटन चळवळीतील योगदान आपण कधीच विसरू शकत नाही. त्यांची ही चळवळ यापुढील काळात अविरतपणे सुरु ठेवण्याचे आवाहन केले. 

पर्यटन व्यवसायिक महासंघ सिंधुदुर्गचे कार्याध्यक्ष सतीश पाटणकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष समीर वंजारी, प्रा. सुभाष गोवेकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला जिल्ह्याध्यक्षा सौ. साक्षी वंजारी, पर्यटन व्यवसायिक नंदू तारी, बाळासाहेब बोर्डेकर, प्रसन्ना कोदे आदी मान्यवर उपस्थित होते.