
बांदा : येथील गोगटे वाळके महाविद्यालय, बांदा येथे जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सिंधुदुर्ग आयोजित पर्यटनावर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण वर्ग आयोजित केला आहे. पर्यटनातील विविध आयाम, बदलते पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, कोकणातील नैसर्गिक पर्यटन याबाबत सविस्तर प्रशिक्षण या प्रशिक्षणात दिले जाणार आहे. पर्यटनाकडे एक उद्योग म्हणून पाहता येईल व पर्यटनाला शासनाच्या मदतीने स्वतःचे पर्यटन विषयक प्रकल्प कसे उभारता येईल याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या सातवी इयत्ता पास असणाऱ्या १८ ते ४५ वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला प्रवेश घेता येईल.
शासनाच्या उपक्रमांतर्गत हे प्रशिक्षण राबविले जाणार असून प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्याना शासनाचे अधिकृत प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. हे प्रशिक्षण ३० दिवसाचे असून २० दिवस मार्गदर्शन व १० दिवस क्षेत्र भेटी दिल्या जाणार आहेत. या कालावधी प्रशिक्षणाचे प्रशिक्षण कालावधीत १००० रुपये विद्या वेतन देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचे अधिकृत प्रमाणपत्र पर्यटन विषयक व्यवसाय सुरू करण्यास व बँकेमार्फत अर्थसहाय्य घेण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. या प्रशिक्षणासाठी मुलाखतीद्वारे प्रशिक्षणार्थींची निवड केली जाणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वानुसार प्रवेश निश्चित केला जाणार आहे. या प्रशिक्षणाची प्रवेश क्षमता फक्त ३३ प्रशिक्षणार्थी अशी आहे. या प्रशिक्षण कालावधीत पर्यटन क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी इच्छुकांनी नाव नोंदणी दिनांक 25 ऑगस्ट पर्यंत करावी. याबाबत अधिक माहितीकरिता या प्रशिक्षणाचे समन्वयक प्रा. डॉ. रमाकांत गावडे (९४२१०९०९६५) व प्रा. डॉ. अभिजित महाले (९४२१२६८२०४) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी केले आहे.