
सावंतवाडी : सावंतवाडी-वेंगुर्ला बस स्टॅन्डवरील प्रसाधनगृहाची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. त्या प्रसाधनगृहाची दुरुस्ती करण तर दूरच स्त्री व पुरुष दोन्ही प्रसाधनगृहाच्या दरवाजांना जाळी ठोकून प्रसाधनगृह बंद करण्यात आले आहेत. याबाबत सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
यामुळे ऐन पावसाच्या दिवसात प्रवासी महिला, विद्यार्थिनी तसेच त्या परिसरातील व्यावसायिक व नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. यासंदर्भात शिक्षक शैलेस्तीन शिरोडकर यांनी सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. येथील परिसर हा अतिशय दुर्गंधीयुक्त बनलेला आहे. कचऱ्याचे साम्राज्य त्या ठिकाणी वाढत साचलेले आहे. तसेच प्रसाधनगृहाच्या टाकीची फरशी फुटून त्यातून घाण वास येत आहे. टाकी उघडी असल्याकारणाने त्यामध्ये कोणी पडण्याचीही भीती निर्माण झाली आहे. प्रसाधनगृहाच्या बाजूलाच खाद्यपदार्थाची बेकरी व खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत.
या सर्व गोष्टींची पहाणी करून यासंदर्भात सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून उद्या डेपो मॅनेजर यांना निवेदन देऊन यावर तत्काळ कार्य करण्याची मागणी करण्यात येणार आहे अशी माहिती रवी जाधव यांनी दिली आहे.