
सिंधुदुर्ग : उत्तम गायक होण्यासाठी उत्तम संगीत भरपूर प्रमाणात ऐकणे आणि उत्तम श्रोता होणे आवश्यक आहे. एकाग्रता, अभ्यास आणि रियाजाच्या जोरावर चांगला अभंगगायक होता येईल, असे प्रतिपादन 'घुंगुरकाठी' सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी काल कळणे (दोडामार्ग) येथे व्यक्त केले
दि आयडियल स्कूल ऑफ म्युझिक आणि नूतन विद्यालय कळणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अभंगगायन व भजन कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळणे शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष सखाराम देसाई होते. कार्यक्रमाला मुख्याध्यापक महेंद्र देसाई, संगीतशिक्षक पी. जी. गोसावी, कळणे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय देसाई, डॉ. सई लळीत आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यशाळेला उपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना श्री. लळीत म्हणाले की, अभंग हा एक हजार वर्षाची परंपरा असलेला जुना काव्यप्रकार आहे. वारकरी संप्रदायाने आध्यात्मिक अभिव्यक्तीसाठी अभंग हा काव्यप्रकार निवडला आणि तो जनमानसात रुजवला. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, जनाबाई, चोखामेळा अशा कितीतरी संतांचे हजारो मराठी अभंग आज महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या ओठावर आहेत. अभंग गायन हा एकल आणि कोरस असा संमिश्र गायन प्रकार आहे. उत्तम अभंग गायक व्हायचे असेल तर आधी उत्तम श्रोता असणे आवश्यक आहे. त्यासाठी पुष्कळ संगीत ऐकले पाहिजे. स्वराचा पक्का अभ्यास केला पाहिजे. शब्दोच्चार योग्य करण्यावर भर द्यायला हवा. प्राणायाम किंवा योगासारख्या प्रकारांनी आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवता येते. त्याचाही अभ्यास करायला हवा.
अभंग गाताना त्या अभंगातील भाव गायनातून व्यक्त झाला पाहिजे, ही बाब सांगताना श्री. लळीत यांनी अनेक विरहिणी आणि भैरवीची उदाहरणे दिली. कोणत्याही गायनात सूर आणि ताल महत्त्वाचा असतो, असे सांगून त्यांनी गोव्यातील जुन्या काळचे लयभास्कर खाप्रुमामा पर्वतकर यांच्या चरित्रातील काही गोष्टी सांगितल्या. शक्यतो स्वतःच्या पट्टीत गाण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही गायकाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या स्वतःच्या पट्टीत, स्वतःच्या आवाजात गाण्याचा प्रयत्न करा, असेही श्री लळीत म्हणाले.
अध्यक्षपदावरून बोलताना श्री. सखाराम देसाई म्हणाले की, नव्या पिढीला गायनाची आवड लावण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा खूप महत्त्वाच्या ठरतील. ही कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल त्यांनी नूतन विद्यालयाचे आभार मानले. श्री. संजय देसाई डॉ. सई लळीत यांनीही मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक महेंद्र देसाई यांनी प्रास्ताविक केले. श्री. पी. जी. गोसावी यांनी आभार मानले. या कार्यशाळेला कळणे पंचक्रोशीतील 75 हुन अधिक युवक युवतींनी सहभाग घेतला आहे. ही कार्यशाळा चार टप्प्यात चालणार आहे.