
सावंतवाडी : टीजेएसबी सहकारी बँकेने आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यूपीआय-आयसीडी अधिग्रहणकर्ता म्हणून लाईव्ह होणारी भारतातील पहिली बँक म्हणून टीजेएसबी बँक आता ओळखली जाईल. या उपक्रमामुळे डिजिटल नवोपक्रम आणि ग्राहकसुलभतेच्या क्षेत्रात टीजेएसबी बँकेचे नेतृत्व अधिक दृढ झाले आहे. सहकारी बॅंकिंग क्षेत्रात तंत्रज्ञानावर आधारित परिवर्तन घडवून दिशेने हा टप्पा टीजेएसबी बँकेच्या प्रवासातील आणखी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरला आहे.
एनपीसीआय (नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया) द्वारे विकसित केलेले यूपीआय-आयसीडी फ्रेमवर्क ग्राहकांना साध्या यूपीआय क्यूआर कोडद्वारे कोणत्याही सहभागी बँकेच्या मशीनवरुन रोख रक्कम जमा किंवा काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. या सुविधेसाठी डेबिट कार्ड किंवा बँक विशिष्ट प्रमाणीकरणाची आवश्यकता पडणार नाही. ज्यामुळे रोख व्यवहार अधिक सुलभ, सुरक्षित आणि इंटरऑपरेबल होतील.
या ऐतिहासिक यशाच्या निमित्ताने टीजेएसबी बँकेचे पेर्टो अँड्रॉइड कॅश रिसायकलर मशीन दि. ७ ते ९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे होणाऱ्या ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२५ मध्ये एनपीसीआयच्या माध्यमातून प्रदर्शित केले आहे.
म्हणून हे पेर्टो अँड्रॉइड मशीन यूपीआय एटीएम तसेच यूपीआय इंटर ऑपरेबल कॅश डिपॉझिटर (यूपीआय-आयसीडी) काम करते. ही यूपीआय आधारित पायाभूत सुविधांच्या विकासातील एक क्रांतिकारी झेप आहे. या माध्यमातून आयसीसीडब्लू-आयसीडीअंतर्गत सहभागी कोणत्याही बँकेचे ग्राहक यूपीआय अॅपचा वापर करुन टीजेएसबीच्या पेर्टी मशीनवर क्यूआर कोड स्कॅन करुन रोख रक्कम जमा किंवा काढू शकतात. सावंतवाडीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देखील या बॅकेच्या शाखा आहे.










