मालकाच्या शोषणाला कंटाळून वृद्धाने स्वतःला संपवलं

Edited by: मनोज पवार
Published on: September 24, 2025 15:12 PM
views 97  views

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यात बेकरी, नमकीन आणि मिठाई उत्पादन करणाऱ्या परप्रांतीय व्यावसायिकाच्या शोषणाला कंटाळून एका ६३ वर्षीय , नारायण सी.एम. (मूळ राहणार कन्नूर, केरळ) या कामगाराने, सोमवार,  ता.२२ सप्टेंबर ला, दुपारी २ ते सायं.७ च्या दरम्यान चिपळूण खेंड भागातील युनिटी बिल्डिंगमधील राहत्या खोली नं. १०२ मध्ये फॅनच्या हुकाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. 

नारायण सी.एम. हा कामगार २५ ते ३० वर्षे या बेकरी कारखान्यात काम करित होता. या घटनेबाबत माहिती घेताना , इतर कामगारांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  परप्रांतीय कामगार कमी पगारावर अनेक वर्षांपासून या कारखान्यात काम करित आहेत. आपल्या मासिक पगारातून खर्चासाठी लागणारी उचल घेऊन बाकी रक्कम वर्षातून एकदा गावी जाताना अथवा काही तातडीची  आवश्यकता भासल्यास हिशेब करून मालकांकडून घेतात. मात्र हा हिशोब करताना आणि हक्काची रक्कम देताना मालक लोक, कामगारांशी वाईट पध्दतीने वागून, विविध कारणे देत रक्कम कापतात,  रक्कम देण्यास टाळाटाळ करतात. अनेक कामगार तुटपुंज्या पगारावर हा कारखान्यात अनेक वर्षांपासून काम करित आहेत. 

आत्महत्या केलेला कामगार आपला हिशोब करून रक्कम मागत होता. त्याला गावी जायचे होते. मात्र त्याला रक्कम देण्यास मालक लोक टाळाटाळ करीत होते. या कारखान्याच्या मालकांचे वरिष्ठ राजकिय आणि अधिकाऱ्यांपर्यंत आर्थिक संबंध असल्याने कोणी यांचे काही वाकडे करू शकत नाही अशी यांची अरेरावीची भाषा असते. 

या बेकरी उत्पादन करणाऱ्या कारखान्याची जिल्ह्यात आणि चिपळूण शहरात विक्रीची मोठ मोठी दुकाने आहेत.  या दुकानांमधून बेकरी, मिठाई , नमकीन तसेच समोसे, पॅटीस तळलेले, ढोकळा आदी विविध पदार्थ विक्रीस असतात. अनेक वेळा यादुकानांमधून नेलेल्या पदार्थांच्या गुणवत्ता आणि खराब पदार्थांबाबत तक्रारी झालेल्या आहेत. मात्र पैशाच्या जोरावर आणि राजकीय वरदहस्तामुळे अशी अनेक प्रकरणे दाबून टाकली गेली आहेत.  मागे चौकशीचा ससेमिरा आणि  राजकिय रोष नको म्हणून कोणी कायदेशीर तक्रार करण्यास पुढे येत नाहीत.

असेच हे आत्महत्या प्रकरण एका रात्रीत दाबून टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. पोलीस चौकशी आणि पोस्टमार्टेमसाठी काढणाऱ्या शासकीय यंत्रणा या वृद्धाच्या आत्महत्या बाबतीत एवढ्या तत्पर होऊन, रात्रीत चौकशी आणि पोस्टमार्टेम करून मृतदेह परप्रांतात रवानाही करण्यात आला हे आश्चर्यच आहे.

पोलिसांकडून आकस्मिक निधन म्हणून नोंद करण्यात आली आहे. या कारखान्यातील कामगारांचे शोषण आणि आत्महत्या झालेल्या वृद्धाश्र न्याय मिळण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून चौकशी आणि नियंत्रण होण्याची गरज आहे. नाहीतर या मालक लोकांच्या शोषणापाई आणखी कामगारांच्या आत्महत्या पाहाव्या लागतील

मालक- आकाश नायर - बेकरी मालक यांच्याशी कामगारांच्या तक्रारी विषयी विचारले असता, अशा पध्दतीने आमच्याकडे कामगारांचे शोषण होत नाही . त्यांना पाहिजे तेव्हा पैसे दिले जातात. आणि वर्षातून एकदा अथवा त्यांना हवा तेव्हा हिशोब करून सर्व पैसे दिले जातात असे सांगितले. 

चिपळूण पोलीस ठाण्यात कामगारांच्या शोषण आणि तक्रारी बद्दल विचारले असता. आपण चौकशी करणार्‍या अधिकाऱ्यास अशा दिशेने चौकशी करण्यास सांगत असल्याचे सांगितले आहे.