
दोडामार्ग : गेले अनेक दिवस प्रतीक्षा असलेलं तिलारी धरण अखेर ८० टक्के भरले असून सोमवारी पहाटे ३.४९ मिनिटांनी सांडवा धरणातून ओवर फ्लो झाले आहे. तिलारी खोऱ्यात व तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे तिलारी धरणातील पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ होऊन धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. सोमवारी पहाटे ४ सुमारास धरणाच्या चारही दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. सायंकाळी ५ वाजता ४६.३८ क्युमेक्स (घ.मी. प्रति सेकंद) ईतका पाण्याचा विसर्ग सुरू होता.
गेले आठवडाभर पावसाची संततधार कायम राहिल्याने तिलारी धरणातील पाणी पातळीत कमालीची वाढ होत होती. त्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पर्जन्य वृष्टीमुळे धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे सोमवारी धरण सांडवा पातळी असलेल्या १०६.७० मीटर उंचीपर्यंत भरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. धरांची
धरणाची एकूण पूर्ण जलसंचय पाणी पातळी ११३.२० मीटर आहे. तर धरणाची सांडवा माथा पातळी १०६.७० मीटर आहे. इतके पाणी भरल्या नंतर खळग्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातो. सोमवारी पहाटे ३.४९ वा.च्या सुमारास पाण्याने सांडवा माथा पातळी ओलांडली व धरणाच्या चारही दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. सध्या ४६.३८ क्युमेक्स प्रति सेकंद पाणी धरणातून बाहेर पडत आहे. बाहेर पडलेले हे पाणी पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीला येऊन मिळत आहे. शिवाय तेरवण मेढे उन्नैयी बंधाऱ्यातून विसर्ग होणारे पाणी देखील तिलारी नदीपात्रात येऊन मिळत असल्याने तिलारी नदी पात्रातील पाण्यातही कमालीची वाढ झाली आहे. या पार्श्व भूमीवर नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन तिलारी पाटबंधारे प्रकल्पाकडून करण्यात आले आहे.
तिलारी धरण ओव्हर फ्लो झाल्यानंतर तिलारीचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी तिलारी धरणाची सोमवारी दुपारी प्रत्यक्ष पाहणी केली. ज्या खळग्यात धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला तेथील परिस्थितिचा आढावा घेत नियुक्त कर्मचारी व अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत. यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय अभियंता गजानन बुचडे उपस्थित होते.