LIVE UPDATES

तिलारी धरण ओव्हरफ्लो

Edited by: लवू परब
Published on: July 02, 2025 17:15 PM
views 370  views

दोडामार्ग : तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अति पर्जन्य रुष्टी होत असल्याने धरणाच्या जलाशयात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन बुधवारी दुपारी धरण ओव्हर फ्लो झाले. दुपारी 2. 50 वाजता सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला. सतत पडणाऱ्या पावसामुळे धरण क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे तिलारी नदीकाठच्या गावांना  सतर्कतेचा इशारा तिलारी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी दिला आहे.

तिलारी धरण परिसरात दोन दिवसांपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात धरणात 165 क्युमेक पाण्याची वाढ झाली आहे. त्यामुळे दुपारी 2.50 वाजण्याच्या सुमारास तिलारी मुख्य धरण ओव्हर प्लो झाल्याने सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला. त्यामुळे मुख्य धरण व उन्नेयी बांधारा या सर्वाचे पाणी तिलारी नदीला सोडण्यात आले आहे. त्यामुळे तिलारी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झालेली आहे. त्यामुळे तिलारी नदी काठच्या गावांना तिलारी पाटबांधरे विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मंगळवारी सकाळी ७:४५ वा.च्या सुमारास धरणाची पाणी पातळी १०५.०८ मीटर झाली होती. बुधवारी सकाळी ७:४५ वा.च्या सुमारास १०६.१० मीटर झाली. तर धरणाची सांडवा माथा पातळी १०६.७० मीटर झाल्यास पाण्याचा विसर्ग सुरू होतो. दुपारी २:५० वा.च्या सुमारास या पातळीत वाढ होऊन सांडवा माथा पातळी ओलांडली व धरणाच्या चारही दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. बाहेर पडलेले हे पाणी पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीला येऊन मिळते. शिवाय तेरवण मेढे उन्नैयी बंधाऱ्यातून विसर्ग होणारे पाणी देखील तिलारी नदीपात्रात येऊन मिळत असल्याने तिलारी नदी पात्रातील पाण्यातही कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे अधिकाऱ्यांनी केले आहे.