तीन दुकानं एकाच वेळी जळाली

Edited by: लवू परब
Published on: August 25, 2025 17:33 PM
views 472  views

दोडामार्ग :  साटेली - भेडशीतील भाजी व्यावसायिकांची तीन दुकाने आगीत भस्मसात होऊन ऐन गणेशोत्सवात भाजी व्यावसायिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली. साटेली  भेडशी मधला बाजार  बँक ऑफ इंडिया समोरील भाजी व्यवसायिकांची झोपडी वजा स्थितीत असलेल्या तीन दुकानांना मध्यरात्री आग लागली ही दुकाने प्लास्टिक, बांबू यांच्या सहाय्याने उभारण्यात आली होती. तिन्ही दुकाने एकमेकांना लागूनच होती त्यामुळे आग लागल्यानंतर तिन्ही ही दुकाने जळून भस्मसात झाली.

आग मध्यरात्री लागल्याने काहीही करता आले नाही. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. यात आगीच्या दुर्घटनेत भाजीपाल्यासाठी लागणारी प्लास्टिक भांडी, वजन काटे आदी सामान जळून खाक झाले. यामुळे ऐन गणेशोत्सवात भाजी व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. ही आग नेमकी कशी लागली याचे कारण समजू शकलेले नाही. तर ही आग कोणी अज्ञाताने जाणून बुजून लावली का? अशी बाजारपेठेत  उलटसुलट चर्चा सुरू आहे.

     गणेशचतुर्थीच्या बाजारासाठी या भाजी व्यावसायिकांची मोठया प्रमाणात भाजी आणली होती. या सर्व प्रकारच्या भाजी पाल्याचे  लागलेल्या आगीत नुकसान झाले याचा मोठा फटका त्यांना बसला आहे. बऱ्याच दिवसांपासून

साटेली  भेडशी मधला बाजार  बँक ऑफ इंडिया समोरील खाजगी जागेत  हे तीन भाजी व्यावसायिक झोपडी वजा स्थितीत प्लास्टिक, बांबू याच्या सहाय्याने दुकाने उभारून व्यवसाय करीत होते. ऐन गणेशोत्सवात भाजीपाला व्यवसाय चांगला होणार यासाठी मालही आणला होता मात्र अचानक आगीची दुर्घटना घडल्याने या भाजी व्यावसायिकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.