
सावंतवाडी : शहरांमध्ये नगर परिषदेच्या समोर नगरपालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या गाड्या, ओला कचरा सुका कचरा अशी वाहने नगरपरिषद कार्यालयाच्या समोर उभी करून ठेवलेली असतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. दुर्गंधीयुक्त रोगराई होण्याची शक्यता आहे असे मत माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी व्यक्त केले आहे.
ओल्या कचऱ्याच्या गाड्या नगरपालिकेच्या समोर उभ्या करून ठेवलेल्या असतात. तसेच त्या ठिकाणी सावंतवाडी एसटी बस स्टॉप सुद्धा असून मॉर्निंग वॉकसाठी फुटपाथ सुद्धा आहे. मात्र या उभ्या केलेल्या गाड्यांमुळे त्या परिसरात दुर्गंधी पसरलेली असते. सकाळच्या वेळी तर वॉकिंग करणाऱ्या नागरिकांना नाक तोंड बंद करून तिथून पळ काढावा लागतो. हा प्रकार नगरपरिषदेच्या अगदी समोर चालू असून हा तात्काळ थांबवण्यासाठी तसेच या गाड्यांसाठी वेगळी जागा पाहून या गाड्या धुवून स्वच्छ करून कोणालाही अडथळा न होणार अशा ठिकाणी पार्किंग करण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी सावंतवाडी नगरपालिकेमध्ये जाऊन अधिकाऱ्यांकडे केली. प्रशासकीय अधिकारी वैभव अंधारे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. तात्काळ योग्य ती कारवाई करू व यापुढे असे होणार नाही व कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घेईन असे आश्वस्त केल्याचे भोगटे यांना सांगितले.