हा तर भाडेकरुने मालकाच्याच घरावर हक्क गाजविण्याचा प्रकार

विशाल जाधव यांच काका कुडाळकरांवर टिकास्त्र
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 22, 2023 19:48 PM
views 244  views

वैभववाडी :  राजकीय स्वार्थापोटी  वेगवेगळे पक्ष फिरणारे आता आमचीच राष्ट्रवादी काँग्रेस खरी असा दावा करीत आहेत.राजकिय सोयीसाठी भाडेकरु सारखे दिवस काढणाऱ्या काका कुडाळकर यांनी आपलीच राष्ट्रवादी खरी असून अन्य राष्ट्रवादी स्वयंघोषित आहे, असे वक्तव्य करुन हसे करून घेण्यापेक्षा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन किती दिवस झाले? असा सवाल करीत कुडाळकरांचे ते विधान म्हणजे मालकाच्या घरावरच भाडेकरुने हक्क गाजविण्याचा प्रकार आहे, अशी टीका युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. विशाल जाधव यांनी लगावला आहे.

जाधव यांनी म्हटले आहे की, 'राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षीय  घटनेची कितपत जाण आहे? याचा विचार करूनच राष्ट्रवादी खरी कोणाची आणि स्वयंघोषित कोणाची अशी बेताल वक्तव्य करा. आपले राष्ट्रवादी काँग्रेसमधील वय किती? आणि आपण यापुढे 'त्या' पक्षाशी एकनिष्ठ राहाल याची हमी काय? आपण आजपर्यंत अनेक राजकीय पक्षांची चव चाखून मोकळे झाला आहात.

खऱ्या राष्ट्रवादीत दोन वेळा प्रवेश करुन ५ तारीखला शरद पवार समर्थक म्हणून प्रतिज्ञापत्र भरुन दिले आणि ६ तारीखला अजित पवार समर्थक होऊन आता दुसऱ्या अजित पवार गटात सामील झाला आहात. त्यामुळे आता तिथे तरी वळवळत न राहता प्रामाणिक राहा. कारण खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय देईल. तो निर्णय आल्यानंतर आपल्या सच्चाईची खरी कसोटी सुरु होईल, त्यामुळे उगाच हाच पक्ष खरा तो पक्ष स्वघोषित आहे ही वक्तव्य करताना थोडे भान असूद्या, अशा शब्दांत जाधव यांनी सुनावले आहे.

शेवटी आपण राजकीय भाडेकरुच आहात. कितीही आगपाखड केली. तरी कुठल्याही पक्षाचे तुम्ही निष्ठावंत होऊ शकत नाही. याची जाणीव ठेवून यापुढे वक्तव्ये करावीत, असा सल्ला विशाल जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिला आहे.