चोरट्यांचं आता मंदिरं लक्ष ; मठ इथल्या श्री स्वयंभू मंदिरातील फंडपेटी फोडली

Edited by: दिपेश परब
Published on: July 14, 2023 20:03 PM
views 146  views

वेंगुर्ला : तालुक्यातील मठ येथील श्री स्वयंभू मंदिरातील फंडपेटी गुरुवारी (१३ जुलै) रात्री ९.३० ते शुक्रवारी (१४ जुलै) सकाळी ७.३० च्या दरम्याने अज्ञात चोरट्यानी फोडून त्यातील अंदाजे सुमारे २४ हजार रुपयांची रक्कम चोरी केल्याची तक्रार मंदिरातील पुजारी दत्ताजी रामचंद्र गुरव यांनी वेंगुर्ला पोलिसात केली आहे. 

    याबाबत सविस्तर माहिती अशी की, मठ गावठणवाडी येथील दत्ताजी रामचंद्र गुरव हे श्री स्वयंभू मंदिरातील पूजा तसेच गाऱ्हाणी घालणे व रात्री मंदिर बंद करणे आदी काम पाहतात. दत्ताजी गुरव हे नेहमी प्रमाणे आज शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता मंदिरात पूजेसाठी गेले असता त्यांना मंदिराच्या मुख्य दरवाजाचा कोयंडा तोडलेल्या स्थितीत दिसला. यानंतर आतमधील लोखंडी ग्रील सुद्धा फोडण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी देवस्थानचे अध्यक्ष मनोहर गावडे, मानकरी प्रकाश हरी ठाकूर, रामचंद्र सावळाराम गावडे यांना बोलावून त्यांना ही बाब सांगितली. यावेळी हे सर्वजण मंदिराच्या मागच्या बाजूस गेले असता पाठीमागे असलेला मुख्य गाभाऱ्यात जाणारा दरवाजा उघडा दिसला. या दरवाज्याची कडी तोडून चोरट्यानी आतमध्ये प्रवेश करून फंडपेटी फोडलेली होती. 

 दरम्यान याबाबत त्यांनी वेंगुर्ला पोलिसात खबर दिली असून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला यात देवस्थान अध्यक्ष व मानकरी यांच्या जबाबानुसार फंडपेटीतील अंदाजे २४ हजार रुपये चोरले असल्याची माहिती वेंगुर्ला पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव व  पोलीस कॉन्स्टेबल रंजिता चौहान करत आहेत.