
देवगड : वाडा घरफोडी प्रकरणातील दोन संशयित चोरट्यांना देवगड पोलिसांनी गुरुवारी डोंबिवली येथून ताब्यात घेतले. प्रणव राजन नारिग्रेंकर (२६) मूळ राहणार इळये पाटथर, सध्या राहणार पितृछाया अपार्टमेंट राम मंदिर जवळ जुने डोंबिवली, हरीश दिलीप आचरेकर (१९) मूळ रा. वाडा आचरेकरवाडी सध्या राहणार वाफी गुजरात) या संशयीतांची नावे आहेत. संशयिताना अटक करून कणकवली न्यायालयात हजर केले असता दोन्ही संशयीतांना न्यायालयाने १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडा भटवाडी येथील वैशाली गोपीनाथ घाडी (वय ६५) या १६ मे रोजी आपले घर बंद करून गोवा येथे गेल्या होत्या. त्या घराच्या बाहेर परिसराची देखभाल दीपक अंकुश जाधव हे पाहत होते तेही २९ मे रोजी मुंबईला गेले होते. ते मुंबईहून परत आल्यानंतर ६ जून रोजी सकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या घरी गेल्यानंतर घराच्या मागील दरवाजा फोडलेला दिसला त्यांनी याबाबत वैशाली घाडी यांना फोनवरून कळविल्यानंतर त्यांनी त्या वाडा येथे गावी आल्या. व त्यावेळी त्यांच्या घराच्या मागील दरवाजा फोडून चोरट्याने आत प्रवेश करून रोख रक्कम दागिने चोरून नेल्याचे निदर्शनास आले. याबाबत पोलिसांना कळविल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल ,अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर,पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन जाधव,आशिष कदम, स्वप्निल ठोंबरे,यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच कणकवली पोलीस उपविभागीय अधिकारी घनश्याम आढाव यांनीही चोरी झालेल्या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या टीमने ही भेट देऊन तपासाला सुरुवात केली होती.
या चोरीमध्ये अज्ञात चोरट्याने बंद घराच्या मागील दरवाजा फोडून एकूण ५ लाख ५५ हजाराची चोरी झाली असल्याचे माहिती फिर्यादी वैशाली घाडी यांनी पोलिसांना दिली असून यामध्ये ४० हजार किमतीचे ३ तोळ्याचे मंगळसूत्र, २५ हजार किमतीचे २ तोळ्याचे मंगळसूत्र, २५ हजार किमतीची २ तोळ्याची पीळ असलेली चैन, १५ हजार किमतीच्या ५ सोन्याच्या अंगठ्या यामध्ये ५ ग्रॅमची एक व ३ ग्रॅमच्या ४ अंगठ्या , १० हजार किमतीचे ५ ग्रॅमचे सोन्याचे कानातले व १ ग्रॅम सोन्याची पट्टीतील नथ, ४० हजार किमतीचे चांदीचे ब्रेसलेट व कंबर साखळी अशी पाव किलो चांदी, ४ लाखाची रोकड यामध्ये ५०० रुपयांच्या ४०० नोटा, १०० रुपयांच्या १ हजार नोटा, २०० रुपयांच्या ५०० नोटा असा या चोरीतील नोटांचा तपशील आहे.असे सोन्याचे व चांदीचे दागिने मिळून १ लाख ५५ हजार किमतीचे दागिने व ४ लाखाची रोकड असे मिळून एकूण ५ लाख ५५ हजाराची चोरी अज्ञात चोरट्याने घरफोडी करून केली.या अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.द.वि कलम ३८०,३५७ अन्वये देवगड पोलिसात पुन्हा दाखल केला होता.
त्यानुसार मोबाईल लोकेशनच्या आधारे संशयित चोरट्यांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. या चोरी प्रकरणातील प्रणव राजन नारिग्रेंकर, हरीश दिलीप आचरेकर या दोन संशयितांना देवगड पोलिसांनी गुरुवारी डोंबिवली येथून ताब्यात घेतल्याचे समजते.