
मालवण : शहरातील मॅकेनिकल रोड येथील व्ही. के. रेस्टॉरंटमध्ये सोमवारी मध्यरात्री तीघा चोरट्यांनी चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी हॉटेलचे शटर बाजूला करत हॉटेलमध्ये प्रवेश करून काऊंटरमधील सुमारे ५५०० रूपयांची रोख रक्कम चोरून पोबारा केला. याप्रकरणी सौ. निकीता वासुदेव चव्हाण यांनी पोलीसात तक्रार दिल्यानंतर पोलीसांनी तीघा चोरट्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहित कलम ३३१ (४), ३२४(२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांकडून संशयीत तिघांचाही शोध घेण्यात येत होता.
सौ. चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सोमवारी मध्यरात्री १.३० ते २.४० या दरम्यान चोरट्यांनी आपल्या हॉटेलचे शटर उघडून दुकानाच्या लाईट तोडून गल्ल्यातील सुमारे ५५०० रूपये चोरून नेले आहेत. चोरट्यांनी हॉटेलचे शटर कुलुपाच्या साईडने खेचून शर्टर पूर्ण उघडून दुकानामध्ये प्रवेश करून चोरी केली होती. सदरची प्रकार एका युवकाने पाहिला आणि त्यांनी आम्हाला कल्पना दिली. यामुळे आम्ही सीसीटिव्ही पाहिली असता संशयीत व्यक्ती दिसून आले आहेत, असे म्हटले आहे. पोलीसांनी तक्रार दाखल करून घेत चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
शहरातील भर बाजारपेठेतील हॉटेलमध्ये झालेल्या चोरीमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. शहरातील सीसीटिव्ही तपासणी आणि पोलीसांनी बसविलेल्या सीसीटिव्हीमध्ये चोरट्यांचा वापर तपासणे आता आवश्यक बनले आहे. मालवण बाजारपेठेमध्ये सलगपणे दोन घटना घडल्याने रात्रीच्यावेळी पोलीसी गस्त कडक करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.