
सावंतवाडी : चोरीच्या उद्देशाने घरात घुसणाऱ्या चोरट्याला पकडून माजगाव ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास येथील पॅलेस हॉटेल लगत घडली. उमेद राम मथुरासाब (२५, सध्या राहणार माजगाव पॅलेस हॉटेल जवळ, मूळ छत्तीसगड ) असे त्याचे नाव आहे. त्याला पकडून पोलिसांचा ताब्यात देण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सोमवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास एक युवक माजगाव पॅलेस येथील रस्त्या शेजारील एका घराच्या खिडकीवर लटकताना खोतवाडा येथील अनिकेत सावंत आणि विघ्नेश रेडकर या युवकांना दिसला. त्यानी गाडी वळवून परत पाहिले असता तिथे कोणी नव्हते. यानंतर थोड्या वेळाने घरा शेजारी राहणाऱ्या लोकांना हा युवक याच स्थितीत परत दिसला. त्यानी आरडाओरड केली असता तो शेजारच्या चर्च मागील जंगलात पळून गेला. त्यानंतर त्यांनी घरात जाऊन पाहिले असता मागील बाजूचा दरवाजा तोडलेला आढळून आला.या घरात एक महिला एकटीच राहते. याचा फायदा घेऊन चोरी करण्यासाठी तो आला असावा अशी माहिती ग्रामस्थानी दिली.
यानंतर स्थानिक ग्रामस्थ प्रतीक सावंत, प्रकाश सावंत,सूरज सावंत, विघ्नेश रेडकर, अनिकेत सावंत, हृषी कळंगुटकर , अखिलेश कानसे, दीप नार्वेकर, प्रथमेश सावंत, तेजस सावंत तसेच शेजारी राहणारे पुष्पसेन सावंत, संभाजी सावंत यांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडून आला नाही. याबाबत तात्काळ पोलीसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.
यानंतर मंगळवारी शेजारी भाड्याने राहणाऱ्या परप्रांतीय कामगारांना धारेवर धरल्यानंतर त्यांनी आपल्यातील एक जण रात्री नसल्याचे सांगितले. यानंतर सायंकाळी या युवकाला पकडून आणण्यात आले. त्याच्या कपड्यावरून त्याची ओळख पटली. यानंतर त्याला ग्रामस्थांनी चांगलाच प्रसाद दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. या चोरट्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.