ई स्टोअरच्या सिंधुदुर्गातील वरिष्ठांनी घेतली परशुराम उपरकर यांची भेट | काय शिजतेय ?

26 ऑगस्ट रोजी योग्य खुलासा न झाल्यास मनसेचा उठाव
Edited by: उमेश बुचडे
Published on: August 21, 2022 20:44 PM
views 175  views

कणकवली : सिंधुदुर्गातील ई स्टोअरचे प्रमुख शैलेश पेडणेकर यांच्यासह सहकाऱ्यानी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या कणकवली कार्यालयात त्यांची भेट घेतली.  त्यावेळी उलट सुलट चर्चेला उधाण आले.  त्या संदर्भात उपरकर यांनी सांगितले की, ई स्टोअरचे वरिष्ठ संजना परांजपे व अनिल जाधव यांना 26 ऑगस्ट रोजी कणकवली येथे चर्चा करण्यासाठी बोलवणार असून त्यावेळी स्टोअरबाबत ज्या काही गोष्टी बोलल्या जात आहेत त्याचा खुलासा केला जाईल.  सिंधुदुर्गातील कुणाची फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असा शब्द दिला असल्याची माहिती मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिली .

मनसेच्या कणकवली येथील संपर्क कार्यालयात ई स्टोअरच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी शैलेश पेडणेकर यांनी माहिती देताना काही लोकांच्या चुकीमुळे असा प्रकार घडला असेल परंतु कुणाचीही फसवणूक होणार नाही, असे सांगताना आमचे वरिष्ठ अनिल जाधव व संजना परांजपे हे 26 ऑगस्ट रोजी कणकवली येथे येतील आणि यावेळी ई स्टोअरच्या कारभाराबाबत संपूर्ण माहिती दिली जाईल असे सांगितले.

यावेळी उपरकर यांनी संबंधितांना स्पष्ट शब्दात सुनावताना सिंधुदुर्गातील कुणाची फसवणूक होता कामा नये आणि 26 ऑगस्ट रोजी याबाबतचा योग्य खुलासा न झाल्यास आम्हाला मनसेच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन आवाज उठवावा लागेल असे सांगताना ई स्टोअरचे जे वरिष्ठ परदेशात आहेत त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात वेगवेगळी आमिषे दाखवून गुंतवणूक करून घेतली जात आहे याबाबतही स्पष्टता आणावी असे सांगितले.  काही लोकांच्या चुकीमुळे असा प्रकार घडला असेल तर संबंधित गैरसमज दूर केले जातील व सिंधुदुर्गातील ग्राहकांना गणेश चतुर्थी पूर्वी योग्य त्या प्रमाणात स्टोअर मधून मालाचा पुरवठा केला जाईल असे यावेळी ई स्टोअर कडून स्पष्ट केले.