हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी होणार पुन्हा उपोषण

Edited by:
Published on: February 03, 2025 20:16 PM
views 17  views

दोडामार्ग : कर्नाटक राज्यातील खानापूर येथे हत्तीपकड मोहिम राबविली, त्याच धर्तीवर दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात ही मोहिम राबवावी, या मागणीसाठी तालुक्यातील अनेक सरपंच, उपसरपंच यांची महत्त्वपूर्ण बैठक सोमवारी संपन्न झाली. हि मोहिम राबविण्याबाबत वनविभागाने कोणतीही ठोस कार्यवाही न केल्याने येत्या १० फेब्रुवारीपासून दोडामार्ग वनविभाग कार्यालयासमोर साखळी पद्धतीने उपोषण छेडण्याचे या बैठकीत एक मताने ठरविण्यात आले. 

हेवाळे, तेरवण- मेढे, घोटगेवाडी, पाळये, सोनावल, केर, मोर्ले, घोटगेवाडी, कोनाळ, परमे, घोटगे गावांत मोठ्या प्रमाणात हत्ती प्रश्न निर्माण झाला आहे. येथील शेतकऱ्यांना मागील अनेक वर्षे हत्ती संकटाने ग्रासले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास हे हत्ती हिरावून घेत आहेत. याकडे वनविभागाचे कायमच दुर्लक्ष होतं आहे. यासाठी जशी हत्ती पकड मोहीम कर्नाटक राज्यातील खानापूर तालुक्यात राबवली तशीच मोहीम दोडामार्ग तालुक्यातील या हत्ती प्रवण क्षेत्रात राबवावी, अशी मागणी स्वराज्य सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष प्रविण गवस यांच्या नेतृत्वाखाली या पंचक्रोशीतील सरपंच व उपसरपंच यांनी वनविभागाकडे केली होती. मात्र यावर ठोस कार्यवाही न झाल्याने हत्तीबाधित गावातील शेतकरी, ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या गावातील सरपंच, उपसरपंच यांची सोमवारी एक बैठक पार पडली. या बैठकीला स्वराज्य सरपंच सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्रविण पांडुरंग गवस, दोडामार्ग तालुका अध्यक्ष अनिल दत्ताराम शेटकर,  पिकुळे सरपंच आपा गवस, आडाळी सरपंच पराग गावकर, साटेली भेडशी सरपंच छाया धरणे, मोर्ले सरपंच संजना धुमासकर, पाटये सरपंच प्रवीण गवस, तळेखोल उपसरपंच महादेव नाईक, आयी सरपंच तुषार  नाईक, परमे सरपंच प्रथमेश मणेरीकर, मणेरी सरपंच सिद्धी कांबळे‌, मणेरी उपसरपंच विशाल परब, झोळंबे सरपंच विशाखा नाईक, केर - भेकुर्ली उपसरपंच तेजस देसाई आदी उपस्थित होते.

साखळी उपोषण करण्यावर एकमत

खानापूरच्या धर्तीवर तिलारी खोऱ्यातही हत्ती पकड मोहीम राबवावी, अशी शासनाकडे मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे उपोषणाखेरीज पर्याय नसल्याचे ठरवत १० फेब्रुवारीपासून साखळी उपोषण करण्याचे एकमताने ठरविण्यात आले. १० फेब्रुवारीला पहिल्या दिवशी सर्व गावातील सरपंच व ग्रामस्थ उपोषण छेडणार आहेत. दुसऱ्या दिवशी ११ फेब्रुवारी रोजी हेवाळे, मोरगाव, तळेखोल, आडाळी, आयी गावातील ग्रामस्थ उपोषणास बसणार आहेत. १२ फेब्रुवारी रोजी तेरवण मेढे, झोळंबे, आंबडगाव, सोनावल, फुकेरी, माटणे, तळकट आदी गावातील सरपंच व ग्रामस्थ उपोषणास बसणार आहेत. १३ रोजी मोर्ले, केर-भेकुर्ली, घोटगेवाडी, पिकुळे, कुंब्रल, झरेबांबर, कोलझर, उसप, कळणे तर १४ रोजी घोटगे, परमे, साटेली भेडशी, सासोली, झरे-२, पाल पुर्नवसन, मणेरी, खोक्रल, कुडासे,  पाटये पुनर्वसन गावातील सरपंच, ग्रामस्थ उपोषणास बसण्याचे ठरविले. न्याय मिळेपर्यंत पुनश्च क्रमनिहाय नियोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी सांगितले.