...तर 15 ऑगस्टला आंदोलन होणारच

अॅड. सुदीप कांबळे यांचा इशारा
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: July 24, 2025 12:38 PM
views 388  views

कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील विविध समस्यांची सोडणूक व्हावी. अन्यथा स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्टला रुग्णालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा सत्यशोधक सेक्युलर फ्रंट महाराष्ट्रचे अध्यक्ष अॅड. सुदीप कांबळे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना दिला होता. यामध्ये रुग्णालयाला प्राप्त झालेली सिटीस्कॅन मशिन प्राप्त व्हावी, या मागणीचाही समावेश होता. सिटीस्कॅन मशिन कार्यान्वित झाली, हे आमच्या आंदोलनाच्या इशाऱ्याचे यश आहे. मात्र, रुग्णालयात मोठ्या संख्येने समस्या असून त्याची सोडवणूक व्हावी, या मागणीसाठी १५ ऑगस्ट रोजी आंदोलन करणारच असल्याचा इशारा अॅड. सुदीप कांबळे यांनी दिला आहे.

कांबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, रुग्णालयात हाडांच्या रुग्णांची हेळसांड होत असून त्यासाठी अद्ययावत यंत्रसामुग्री व २४ तास तज्ञ उपलब्ध करावेत. डॉक्टर सातत्याने रजेवर असतात, त्यांना अशा रजा मंजूर करू नयेत. सोनोग्राफीसाठी रेडियोलॉजिस्ट तात्काळ उपलब्ध करावा. रुग्णालयात मिनी रक्तपेढी उपलब्ध करावी. वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्गनगरी येथो गोवा बांबोळीसारखी सुदृढ आरोग्य व्यवस्था करावी. रुग्णालयात सीसीटीव्ही बसवावेत, अशा आमच्या मागण्या आहेत. या सर्व मागण्यांची १४ ऑगस्टपर्यंत सोडवणूक न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करणार असल्याचे अॅड. कांबळे यांनी म्हटले आहे.