माझ्या रक्तात बेईमानी, गद्दारी नाही !

राणे - केसरांवर बरसले विनायक राऊत वेर्ले, शिरशिंगे ग्रामस्थांचा 'उबाठा' शिवसेनेत प्रवेश
Edited by: विनायक गांवस
Published on: April 30, 2024 05:20 AM
views 331  views

सावंतवाडी : मी लोकांना लुबाडलं नाही, प्रकल्पात जमीनी हडप केल्या नाहीत. ना गद्दारी, बेईमानी केली. ज्यांनी मोठं केलं त्यांच्याशी गद्दारी, बेईमानी करण माझ्या रक्तात नाही अस विधान इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी करत नारायण राणे- दीपक केसरकरांवर हल्लाबोल केला. माडखोल येथील जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी वेर्ले, शिरशिंगे गावातील ग्रामस्थांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

ते म्हणाले, आजवर १५० बैठका मतदारसंघात घेतल्या, लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. माझ्याकडे पैसा नाही. पण, माणसांच प्रेम माझ्यावर आहे. ही स्व. बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरेंची पुण्यायी आहे. गरीब कुटुंबांमधला, दादरच्या फुटपाथवर बसून कपबश्या विकणारा मी होतो. बाळासाहेबांमुळे आज या ठिकाणी आहे. त्यामुळे ज्यांनी मोठं केलं त्यांच्याशी गद्दारी करणं आमच्या रक्तात नाही. दीपक केसरकर व नारायण राणेंच विळ्याभोपळ्या नात होत. दहशतवादाच्या विरोधात केसरकर बोलत होते. पण, आज सत्तेसाठी उद्धव ठाकरेंच्या द्वेषापोटी एकत्र आलेत. माझ्यावर बाळासाहेब, उद्धव ठाकरेंचे संस्कार आहेत. ज्या केसरकरांना मंत्री, गृहमंत्री केलं तरी त्यांनी बेईमानी केली. पैशासाठी ही मंडळी गद्दार झाली. मला साध राज्यमंत्री पद दिले नाही अशी टीका केसरकर करतात. मी मंत्रीपदासाठी हपालेलो नाही. पैशासाठी गद्दारी करणारा मी नाही. आजची ही तिसरी सभा पण 'व्हॅनिटी'ची गरज लागली नाही. शिरशिंगेत तुमची व्हॅनिटी जाईल का ? तिकडे पांडूरंग सर्व्हिसच पाहीजे अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली. तर नारायण राणे मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रात मंत्री झाले. एवढी पद घेऊन तुम्ही काय केलत ? ते सांगाव नंतर मी काय केलं ते सांगतो असं आव्हान देत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आम्ही आणलं असं खा.राऊत म्हणाले. मी लोकांना लुबाडलं नाही, प्रकल्पात जमीनी हडप केल्या नाही, ना बेईमानी केली. चिपी विमानतळाची रूजवात नारायण राणेंनी जरी केली तरी ते पूर्णत्वास विनायक राऊत यांनीच आणलं असं विधान करत राणे केसरकरांवर हल्लाबोल केला.

याप्रसंगी दोडामार्ग, मळेवाड, माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघात चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहेत. विनायक राऊत निवडून येणार असा विश्वास जनताच व्यक्त करत आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचे उमेदवार विनायक राऊत तिसऱ्यांदा खासदार होतील असा विश्वास शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केला. तर कोकणचा कॅलिफोर्निया करणार ही आश्वासने जूनी झालीत‌. कोकणचा कॅलिफोर्निया नको, कोकणचा कोकण राहीला पाहीजे आणि तो आम्ही सत्तेत येऊन करू असं घारे-परब म्हणाल्या. कॉग्रेस नेते विकास सावंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांसह मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, संजय पडते, इर्शाद शेख, अँड. दिलीप नार्वेकर, शैलेश परब, शब्बीर मणियार, अण्णा केसरकर, विभावरी सुकी, जान्हवी सावंत, समीर वंजारी, रूपेश राऊळ, पुंडलिक दळवी, बाळा गावडे, चंद्रकांत कासार महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.