
सावंतवाडी : डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत तांबुळी येथे कोकण श्री ग्राम सेंद्रिय शेतकरी उत्पादक कंपनीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे आत्मा संचालक अशोक किरनंळी यांचे शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा आत्मा उपसंचालक प्रगती तावरे, उपसरपंच जगदीश गवस, मंडळ कृषी अधिकारी बांदा युवराज भुइंबर ,कंपनीचे संस्थापक संचालक मंडळ, कंपनीचे संस्थापक सदस्य, घारपी,असनिये व तांबोळी गावातील प्रगतिशील शेतकरी उपस्थितीत होते. नैसर्गिक व सेंद्रिय शेतीसाठी निवडलेल्या क्षेत्रात रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर थांबवून जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवून जमिनीची सुपीकता व आरोग्य सुधारते. तसेच
विषमुक्त अन्न,प्रदूषण विरहित जमीन व पाणी आणि एकूणच शाश्वत कृषी उत्पादनासाठी नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला पर्याय नाही . या दृष्टीने राज्यात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याकरिता डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान , राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन, परंपरागत सेंद्रिय शेती मिशन राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत तांबुळी,असनिये,घारपी या तीन गावातून एकूण दहा गट स्थापन करून शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात आली. सेंद्रिय शेतीचा अवलंब करून शेतीसाठी लागणारी जैविक व सेंद्रिय खते जैविक कीटकनाशके कंपनीमार्फत सामूहिक तत्त्वावर उत्पादित करून त्यांचा वापर स्वतःच्या शेतात करणे तसेच जादाचे उत्पादन विक्री करून शेतकऱ्यांनी त्यांचे एकंदरीत उत्पादन वाढवणे हा प्रमुख उद्देश या अभियानाचा आहे. नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन खर्चामध्ये बचत होणार असून पौष्टिक विषमुक्त अन्नाची निर्मिती होऊन त्याचा फायदा सध्याच्या आणि पुढील पिढ्यांना देखील होणार आहे असे मत महाराष्ट्र राज्य संचालक आत्मा अशोक किरनंळी यांनी व्यक्त केले. सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2025 च्या यशस्वीतेसाठी तसेच सेंद्रिय कंपनीच्या भरभराटीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी तिन्ही गावातील शेतकऱ्यांना एकत्र करून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून विषमुक्त शेती करण्याविषयी मार्गदर्शन तसेच शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन एकूण दहा गटांची स्थापना करून कोकण श्री ग्राम सेंद्रिय फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करण्यात तांबुळी कृषी सहाय्यक मिलिंद निकम यांच्या योगदानाविषयी तसेच त्यांच्या कार्याविषयी महाराष्ट्र राज्य संचालक अशोक किरनंळी यानी विशेष कौतुक केले. शेतकरी उत्पादक कंपनीच्या एकूण कार्याविषयी बोलताना उपसंचालक आत्मा श्रीमती प्रगती तावरे मॅडम यांनी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सर्व संचालक व अध्यक्ष यांचे विशेष कौतुक करून त्यांच्या कार्याबाबत अभिनंदन केले. कोकण श्री ग्राम सेंद्रिय फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने तांबुळी, असनिये, घारपी या तिन्ही गावात सेंद्रिय शेती खऱ्या अर्थाने यशस्वी होत असून शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीचा निर्धार केल्याबाबत मंडळ कृषी अधिकारी बांदा युवराज भुईंबर यांनी अभिनंदन केले. तसेच कंपनीने कृषी उत्पन्न बाजार समितीकडून परवाना घेऊन काजू बी नारळ सुपारी कोकम इत्यादी शेतमाल खरेदी विक्रीचे कामकाज सुरू करून सभासद शेतकऱ्यांना चांगला भाव मिळवून द्यावा याबाबत मार्गदर्शन केले. कृषी विभागाच्या वतीने आणि मार्गदर्शनामुळे उत्पादक शेतकरी कंपनीची स्थापना होऊन भविष्यात गती प्राप्त होईल याबाबत शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक अभिलाष देसाई, हरिश्चंद्र गावडे, एम.डी. सावंत यांनी आपले मत व्यक्त केले व कृषी विभागाच्या सहकार्याने कंपनीमार्फत जैविक खते ,कीटकनाशके तयार करण्याचे गट व कंपनी पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. यावेळी कृषी पर्यवेक्षक बांदा मनाली परब, प्रगतिशील शेतकरी व कंपनीचे संचालक आनंद सावंत ,उत्तम सावंत, यशवंत सावंत घनश्याम सावंत, पूजा सावंत, भालचंद्र सावंत,रमेश सावंत.अशोक सावंत,महेश सावंत,महादेव सावंत,संजय सावंत तसेच शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज भुइंबर यांनी केले तर मीनल परब बीटीएम आत्मा यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी विलवडे येथील प्रगतशील शेतकरी प्रमोद दळवी यांचे लाख फळबाग लागवड प्रक्षेत्राला भेट देऊन व्हिएतनाम फणस, गमलेस फणस, निर फणस, काकडी, सावरबोंडी केळी लागवड क्षेत्राची पाहणी मा. श्री अशोक किरनळी करून शेतकरी करत असलेल्या विविध नाविन्यपूर्ण प्रयोगांची माहिती घेतली व व्यावसायिक शेती बद्दल शेतकऱ्यांना असलेल्या जानिवे बाबत समाधान व्यक्त केले. तसेच शेतात पीक काढणीनंतर शिल्लक राहणाऱ्या अवशेषांपासून जैविक खत निर्मितीबाबत मार्गदर्शन केले. डेगवे येथील स्वप्निल देसाई यांच्या पिएमएफएमई अंतर्गत काजू, मसाले , फळ प्रक्रिया युनिटची पाहणी करून एग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड योजनेचा लाभ घेणेबाबत मार्गदर्शन केले शेतकऱ्यांनी स्वतःचा कोकणी गोडवा हा ब्रँड निर्मिती करून मोठ्या शहरात स्वतःच्या दुकानाद्वारे तसेच ऑनलाइन विक्री करीत असले बाबत विशेष कौतुक केले.