जर्मनीत कौशल्याला खुप वाव : दीपक केसरकर

भोसले नॉलेज सिटी येथील जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग
Edited by: विनायक गांवस
Published on: July 08, 2024 07:37 AM
views 171  views

सावंतवाडी : आई-वडीलांनी कर्ज घेऊन शिकवलं त्याची भरपाई आपण केली पाहिजे. जर्मनी सारख्या देशात कौशल्याला खुप वाव आहे. आपली मुलं कौशल्यात कुठेही कमी नाहीत. त्यामुळे या संधीचा आपल्या भागातील मुलांनी लाभ घ्यावा. नरेंद्र मोदी यांनी स्कील डेव्हलपमेंटची मुहुर्तमेढ रोवली. त्याचा फायदा आता होत आहे‌. राज्य सरकार हे कार्य वेगाने पुढे घेऊन जाईल. येते तीन महिने पूर्णवेळ जर्मन भाषा शिकण्यासाठी द्या. हा प्रयोग यशस्वी झाल्यास महाराष्ट्रासाठी तो आदर्शवत असेल. सिंधुदुर्गच्या मुलांचा आदर्श राज्यातील मुलं घेतील तो दिवस आनंदाचा असेल असं मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केल.भोसले नॉलेज सिटी येथील जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते‌.

शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व ग्योथे संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जर्मनी देशाला कुशल मनुष्यबळ पुरविणे (पथदर्शी अभ्यास) जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी ऑनलाईन पद्धतीने पालकमंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित होते. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या वर्गाचा शुभारंभ करण्यात आला.  यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, जगातील सगळा व्यवहार हा इंग्रजीत होतो असं नाही. प्रत्येक देशाची भाषा वेगळी आहे. जर्मनीने जगाला सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ दिले आहेत. त्यांना सगळ्यांना इंग्रजीच न्यान होतच अस नाही. आजच्या काळात जर्मन, फ्रेंच या भाषांच ज्ञान असणं आवश्यक आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत देश जर्मन आहे. या देशात स्वच्छता व शिस्तीला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे येणाऱ्या तीन महिन्यांत जर्मन शिकण्यासाठी सतत त्या भाषेतून संवाद करण आवश्यक आहे.‌ जर्मनीला जाऊ इच्छिणाऱ्या मुलांनी याकडे अधिक लक्ष द्यावे असे आवाहन दीपक केसरकर यांनी केलं.

तर, पहिली बॅच सिंधुदुर्गच्या मुलांची जर्मनीला जाणार आहे. १ कोटी रुपये खर्च सीएसआर फंडातून आपण करत आहोत‌. भारताचे जुने संबंध जर्मनीशी आहेत. भारतीय जर्मनीमध्ये जाण्याची सुरूवात आता होत आहे.जर्मनमधील मराठी माणसं तुमच्यासोबत तिथे असणार आहेत. भारतीयांकडे प्रचंड बुद्धिमत्ता आहे. येणारे तीन महिने पूर्णवेळ जर्मन भाषा शिकण्यासाठी द्या. हा प्रयोग यशस्वी झाल्यास महाराष्ट्रासाठी तो आदर्शवत असेल. सिंधुदुर्गच्या मुलांचा आदर्श राज्यातील मुलं घेतील तो दिवस आनंदाचा असेल असं मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग हा

महाराष्ट्र शासन व जर्मनीतील राज्य यांच्यातील उपक्रम आहे. जर्मनीत नोकरीसाठी जाणाऱ्या मुलांना चांगले मानधन मिळणार आहे. महाराष्ट्रातील मुलांमध्ये उर्जा निर्माण करणारा हा प्रकल्प आहे. लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा उपक्रम आहे‌. प्रत्येक जिल्ह्यातून ३०० मुलं जर्मनीला पाठवण्याचा आमचा मानस आहे असंही मंत्री केसरकर म्हणाले.

याप्रसंगी ग्योथोचे संचालक मार्कस बिशेल, जिल्हाधिकारी किशोर तावडे, वरिष्ठ अधिकारी राहूल रेखावार, शिक्षण आयुक्त सुरज पांढरे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहूल रेखावार यांनी केल. सुत्रसंचालन प्रा. अमर प्रभू तर आभार शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी मानले. याप्रसंगी शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य सूरज मांढरे,  परिवहन आयुक्त विवेक भिमनवार,रा.शै.सं.व.प्र.प महाराष्ट्र राज्य,संचालक राहूल रेखावार, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे,मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग मकरंद देशमुख, ग्योथे संस्था संचालक मार्कस बिशेलं,उपसंचालक अलिसिया पाद्रोस,विभागप्रमुख, भाषा, ग्योथे संस्था, मुक्ता गडकरी, भोसले नॉलेज सिटी संस्थापक अच्युत सावंत भोसले,प्रकल्प समन्वयक, ग्योथे संस्था श्रुती नायगावकर, महेश चोथे, राजेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.