दोडामार्गात चोरी ; हैदराबादमध्ये अटक !

बदली झालेली असतानाही पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी बजावलं कर्तव्य
Edited by: संदीप देसाई
Published on: January 30, 2024 09:49 AM
views 1101  views

दोडामार्ग : दोडामार्ग शहरात ३१ डिसेंबर ला भरदिवसा फ्लॅट फोडून लाखाचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्याला अखेर हैदराबाद येथून अटक करण्याची किमया दोडामार्ग पोलिसांनी केली आहे.

    पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास करणारे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश ठाकूर यांच्या टीमने सहा.पो. निरीक्षक आनंद नाईक यांच्या टीमने मोबाईल लोकेशन आधारे संशयित मोहम्मद सोहेल गुलाम मोहम्मद कृषी  या २४ वर्षीय आरोपीला गजाआड केलं आहे. 

    दोडामार्ग नगरपालिका गार्डन येथील पद्मावती प्लाझा मधील पुंडलिक दत्ताराम गवस यांच्या फ्लॅट न. SF 3 भर दिवसा फोडून  रोख 68,000 रुपये, 20,000/- किंमतीची दीड तोळा अंगठी आणि एक samsang कंपनीचा Galaxy F34 5G मोबाईल असा माल या चोरट्याने लंपास केला होता.  फ्लॅट च्या दरवाजाचे कुलूप तोडून त्या वाटे आत मध्ये प्रवेश करून फिर्यादी यांच्या मालकीच माल चोरी करून चोरून नेला होता.

 त्यानंतर पोलिसांनी अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करून चोरीचा तपास सुरू केला होता. हा तपास सुरू असताना तपासणीस अधिकारी जयेश ठाकूर यांनी विशेष मेहनत घेत सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन द्वारे सदर चोरट्याचा शोध घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला. मोबाईल द्वारे मिळालेल्या लोकेशन नुसार आरोपी मोहम्मद हैद्राबादला असल्याचं सुगावा पोलिसांना लागला.  त्यानंतर पोलीस निरीक्षक अरुण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश ठाकूर यांनी स.पों. नी. आनंद नाईक यांचेसमवेत अचूक मोर्चे बांधणी केली.  सहायक पोलीस निरीक्षक आनंद नाईक, हवालदार विठोबा सावंत व चालक अशी तीन जणांची टीम हैद्राबादला रवाना झाली. तेथील पोलिसांची मदत घेत हैद्राबाद गोवळकोंडा जमाल मुंडा येथून या  आरोपीला अखेर मोठ्या शीताफिने सोमवारी या टीमने ताब्यात घेतलं. त्यानंतर आरोपीसह हे पथक दोडांमध्ये दाखल झाले असून त्या आरोपीला आज मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर आरोपी या थर्टी फर्स्ट एन्जॉय करण्यासाठी हैदराबादहून गोव्याला आला होता. आणि गोव्याला जात असतानाच भर दिवसा त्याने दोडामार्ग मधील तो फ्लॅट फोडून त रोख रकमेसह लाखाचा माल घेत गोव्यात थर्टी फर्स्ट एन्जॉय करत जीवाचा गोवा केला.  त्यानंतर पुन्हा तो हैद्राबादकडे गेला. मात्र मिळालेल्या तांत्रिक व खात्रीशीर माहिती द्वारे पोलिसांनी या आरोपीला गजाआड केले. त्याच्यावर अजूनही चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे येत आहे. यापूर्वी  दोडामार्गमध्ये अनेक चोऱ्या झाल्या आहेत. मात्र चोरट्यांपर्यंत पोहोचून त्यांना गजाआड करण्यात पोलिसांना यावेळी आलेल्या यशाचं दोडामार्ग वासियातून स्वागत केले जात आहे.


जाता जाताही दोडामार्गवासियांसाठी करून दाखवलं !

दरम्यान दोडामार्ग पोलीस निरीक्षक अरुण पवार यांची मुंबई येथे बदली झाली आहे. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होतात ते लगेचच दोडामार्ग मधून मुंबईकडे तिथला चार्ज घेण्यासाठी रवाना होणार आहेत. त्यांना दोडामार्ग मध्ये काम करण्यासाठी अवघा 7 महिन्यांचा कालावधी मिळाला. मात्र या कालावधीतही त्यांनी दोडामार्गमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यात कोणतेही कसर केली नाही. उलट पोलीस, प्रशासन आणि जनता यातील ते प्रमुख दुवा बनले. आल्या आल्याच त्यानी साटेली भेडशी येथील हाताळलेला रस्ता प्रश्न आणि त्यातून काढलेला सुवर्णमध्य आजही तालुका वसियांच्या लक्षात आहे. आणि आता पुन्हा जाता जाता सर्वसामान्य जनतेची असलेली मोठी अपेक्षाही त्यांनी कृतीतून पूर्ण करून दाखवली आहे. मोठ्या मेहनतीने कमावलेली संपत्ती जर चोरटे अशा पद्धतीने चोरी करत असतील तर कायदा व सुव्यवस्था बाळगणाऱ्या पोलीस यंत्रणेने या चोरट्यांना गजाआड करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे, त्यांना अद्दल घडवणे, गेलेला माल रिकव्हरी करणे अशा अपेक्षाही सर्वसमान्य जनतेच्या असतात. याच अपेक्षा या निमित्ताने पोलीस निरीक्षक अरुण पवार व त्यांच्या टीमने पूर्ण केल्या. पोलीस निरीक्षक अरुण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश ठाकूर, आनंद नाईक व त्यांची टीम अतिशय समन्वय साधून दोडमर्ग तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून जनतेला लोकाभिमुख सेवा देण्यासाठी मेहनत घेत होती. त्यांच्या मेहनतीचे थेट हैद्राबाद मधून दिवसा ढवळ्या चोरी करून पसार होणाऱ्या चोरट्याला अवघ्या महिनाभरात गजाआड केल्याने तालुकावासियातून  श्री. पवार, ठाकूर, नाईक व पोलिसाच कौतुक होत आहे.