दोडामार्ग बाजारपेठेतील 'त्या' चोरीचा उलघडा !

अवघ्या चार दिवसात दोडामार्ग पोलिसांनी लावला शोध !
Edited by: संदीप देसाई
Published on: March 30, 2024 08:28 AM
views 566  views

दोडामार्ग :  दोडामार्ग शहर बाजारपेठेत दिवसाढवळ्या झालेल्या चोरीचा उलगडा करण्यात अखेर दोडामार्ग पोलिसांना यश आल आहे. याप्रकरणी अवघ्या चार दिवसांत  पोलिसांनी संशयित रामेश्वर केशव म्हाळसेकर रा. म्हाळसा, पर्ये, साखळी, गोवा याला अटक केली आहे. इतकचं नव्हें तर त्या चोरट्याकडून तीन ग्रॅमचे दागिने व १५ हजार ८५० रुपये असा मुद्देमालही ताब्यात घेतला आहे. 


आठवडा बाजारात एका महिलेचे सुमारे पावणेतीन लाख रुपयांच्या दागिन्यांची बॅग चोरीस गेल्याची घटना घडली होती. पुणे येथून रसिका गवस होळी सणानिमित्त आपल्या मांगेली या मुळ गावी जाण्यासाठी रविवारी आल्या होत्या. सुरुवातीला त्या दोडामार्ग बाजारपेठेत आल्या. दोडामार्ग-तिलारी रोडवरील एका सुपर मार्केटमध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या. आत जाताना त्यांनी आपली सामानाची बॅग दिर सचिन गवस यांच्या दुचाकीवरच ठेवली होती. दहा ते पंधरा मिनिटांनंतर खरेदी होताच पैसे नेण्यासाठी त्या दुचाकीजवळ आल्या असता त्यांची बॅग तेथे नसल्याचे त्यांना दिसले. यावेळी त्यांची भंबेरी उडाली होती. कारण त्या बॅगमध्ये त्यांचे लाखो रुपयांचे दागिने व सामान होते. त्यांनी सुपर मार्केटच्या परिसरात बॅग शोधली. मात्र ती सापडली नव्हती. त्यामुळे आपली बॅग चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी सुपर मार्केटच्या  सीसीटिव्हीद्वारे बॅग व चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यात यश मिळाले नव्हते. 

अखेर चोरीची तक्रार देण्यासाठी रसिक गवस यांनी थेट दोडामार्ग पोलिस गाठले. चोरीस गेलेल्या बॅगमध्ये लाखो रुपये किंमतीचे दागिने होते. यात १ लाख ३५ हजार रुपयांचे २७ ग्रॅम मंगळसूत्र, ३० हजार किंमतीचे सहा ग्रॅमचे एक पदरी मंगळसूत्र, ५५ हजार किंमतीचा १२ ग्रॅमचा सोन्याचा हार, १६ हजार किंमतीचे ३ ग्रॅम कानातील कुढी, २० हजार किंमतीचे ४ ग्रॅम सोन्याची अंगठी, ३५०० किंमतीचे १ ग्रॅम नाकातील नथ, १५ हजार किंमतीचा कॅनाॅनचा कॅमेरा व १ हजार किंमतीचे स्मार्ट वाॅच असा ऐवज असल्याची तक्रार त्यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली होती. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.द.वि. ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अखेर याप्रकरणी पोलिसांनी आरोपी गजाआड केला असून आता संपूर्ण मुद्दे माल त्यांचेकडून हस्तगत करणे पोलिसांसमोर मोठ आव्हान आहे. दरम्यान या पोलीस कारवाईचे दोडामार्ग वासियांतून समाधान व्यक्त होत आहे.