
सिंधुदुर्गनगरी : घरकामाला असलेल्या घरात चोरी केल्याप्रकरणी आरोपी दीपाली गौतम कदम रा. सिद्धार्थनगर ओरोस हिला मुख्य नायदंडाधिकारी व्ही. आर. जांभुळे यांनी १ वर्षे साधी कैद आणि १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकारपक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता शिल्पा गोबाडे यांनी काम पाहिले.
फिर्यादी देवयानी विलास कुलकर्णी - देशपांडे यांच्या ओरोस जैतापकरवाडी येथील घरात आरोपी दीपाली कदम ह्या घरकामासाठी होत्या. २१ ऑक्टोंबर २०२३ रोजी दिपाली यांनी फिर्यादी यांच्या घरातून काळया रंगाचा मोबाईल आणि ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगसूत्र चोरून नेल्याची तक्रार फिर्यादी यांनी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार दीपाली कदम यांच्या विरोधात सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयात झालेल्या सुनावणीत एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी दीपाली कदम हिला १ वर्ष साधी कैद आणि १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने जादा कैद अशी शिक्षा सुनावली आहे.