निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याच्या घरात चोरी

Edited by: विनायक गांवस
Published on: April 15, 2025 11:19 AM
views 315  views

सावंतवाडी : निरवडे येथील निवृत्त रेल्वे कर्मचारी विठ्ठल सदाशिव नाईक यांच्या घरात अज्ञात चोरट्याने घुसून तब्बल १ लाख ८० हजाराचा मुद्देमाल लंपास केला आहे. यात १ लाखाच्या रोख रक्कमेसह ८० हजाराच्या दागिन्यांचा समावेश आहे. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. दरम्यान त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


यातील फिर्यादी नाईक हे निरवडे येथील माऊली सृष्टी बिल्डिंग समोर असलेल्या घरात राहतात. गेले काही दिवस ते कामानिमित्त मुंबई येथे आपल्या मुलाकडे गेले होते. श्री. नाईक घरी परतले यावेळी त्यांना आपल्या मुख्य दरवाज्याचा कडी-कोयंडी तोडलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी घरात प्रवेश केला असता घरात असलेली रोख रक्कम १ लाख ८० हजार व पत्नीचे २४ ग्राम वजनाची सोन्याची चैन, ३ ग्राम वजनाची कानातील कुडी दिसून आली नाही. यावरून आपल्या घरात चोरी झाल्याची त्यांना समजले. त्यांनी यावर तात्काळ पोलिसात धावून घे विरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक प्रमोद पाटील अधिक चौकशी करत आहेत