शिक्षकांचा प्रलंबित प्रश्न जि.प. अध्यक्ष मार्गी लावणार ?

प्राथमिक शिक्षक संघान घेतली भेट
Edited by: विनायक गांवस
Published on: April 02, 2026 18:24 PM
views 90  views

जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी 

सावंतवाडी : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, सिंधुदुर्गच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची समक्ष भेट घेऊन  सन २००७,  २००८ व २००९ या कालावधीत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मध्ये सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी केली. 


सन २००७ मध्ये जे स्थानिक डीएड बेरोजगार मोठ्या संघर्षानंतर सेवेत दाखल झाले त्यांचे संपूर्ण श्रेय माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनाच आहे. हे डीएड बेरोजगार २००२ मध्ये सेवेत दाखल होणार होते. परंतु, प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे त्यांच्यावर त्यावेळी अन्याय झाला. १ नोव्हेंबर २००५ नंतर नेमणूक झाल्यामुळे शिक्षक जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित राहणार होते. परंतु महाराष्ट्र शासनाने, 01-10-2024  या संदर्भीय शासन निर्णयानुसार 01 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरती जाहिरात किंवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत शासन आदेश निर्गमित केल्यामुळे वरील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू होण्याची संधी प्राप्त झाली. या अनुषंगाने जिल्हा परिषद सिंधुदुर्ग कडून जुन्या पेन्शन योजनेचे प्रस्ताव अर्ज मागविण्यात आले. विहित वेळेत प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे शिक्षकांनी सादर केलेले आहेत. परंतु, या प्रस्तावावर जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शिक्षक जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित राहिल्यास शिक्षकांचे भवितव्य अंधकारमय बनण्याची भीती निर्माण झाली आहे. हे प्रस्ताव सादर करून जवळपास दोन वर्षे होऊन गेली. परंतु, उचित कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे शिक्षक विवंचनेत आहेत. या काळात जिल्हा परिषदेवर प्रशासकीय कारभार असल्याने या भूमिपुत्र शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेच्या कामात दिरंगाई झाल्याचे दिसून येते आहे. परंतु, आता लोकनियुक्त शासकांच्या हाती कारभार आल्यानंतर हा प्रश्न निकाली निघण्यास महत्त्वाची भूमिका निश्चितपणे निभावू शकता अशी अपेक्षा संघटनेकडून व्यक्त केली आहे. संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांना जुनी पेन्शन योजना प्रस्ताव मंजूर होऊन पीएफ खाते उघडण्यास परवानगी मिळावी अशी मागणी करण्यात आली. अध्यक्ष श्री. कामत यांनी तात्काळ प्राथमिक शिक्षणाधिकारी जयप्रकाश परब यांना समक्ष बोलावून घेऊन चर्चा केली. चर्चेअंती सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यादीतील सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना सुरू करण्यात येईल अशी ग्वाही दिली. या शिष्टमंडळात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष म . ल. देसाई, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वळवी, जिल्हा सरचिटणीस महेश पालव, संजय शेडगे, नरेंद्र सावंत, श्री कुर्लेकर, विजय गावडे अनिल वरक, लक्ष्मण बरागडे, श्री विरनोडकर, भास्कर गावडे, प्रशांत वारंग , शिक्षक बँक संचालक श्री सुभाष सावंत आदी पदाधिकारी तसेच संघटना शिलेदार उपस्थित होते.