वादग्रस्त पोस्ट प्रकरणी 'त्या' युवकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात !

Edited by: विनायक गांवस
Published on: January 24, 2024 10:35 AM
views 1429  views

सावंतवाडी : सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सावंतवाडी शहरातील संबंधित युवतीलाही सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर सावंतवाडी शहरातील अन्य काही जणांनीही तीच वादग्रस्त पोस्ट शेअर केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली यांच्यासह शिष्टमंडळाने सावंतवाडी पोलीस उपविभागीय अधिकारी संध्या गावडे यांची भेट घेतली असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वादग्रस्त स्टोरी सोमवारी सावंतवाडीतील एका महाविद्यालयीन युवकाने सोशल मिडीयावरील आपल्या अकाऊंटवर शेअर केली होती. यामुळे संतप्त झालेल्या हिंदू धर्मियांनी पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांची भेट घेत संबंधित युवकासह पोस्ट शेअर करणाऱ्या सर्वांवर तत्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. मात्र, याबाबत चौकशी सुरु आहे असे सांगत संबंधितावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याने अखेर सायंकाळी ७ च्या सुमारास भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, मनोज नाईक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका प्रचारक नितीन गावडे, सकल मराठा समाज सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिताराम गावडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धडक देत संबंधितावर तत्काळ गुन्हा दाखल करा अशी आग्रही मागणी केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी गुन्हा दाखल करण्याची ग्वाही दिली.
     
 दरम्यान, भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी खासदार निलेश राणे, कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्वरीत कार्यवाही करण्याची मागणी केली. यानंतर रात्री उशिरापर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर हिंदू धर्मीय सावंतवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मोठ्या संख्येने हिंदू बांधव पोलीस ठाण्याच्या आवारात उपस्थित होते. केतन आजगांवकर, किशोर चिटणीस सुनील सावंत, गौरव शंकरदास, कृष्णा धुळपणवार, सुधाकर राणे, अजय सावंत, अजित सांगेलकर, प्रतिक बांदेकर आदिसह शेकडो युवक पोलीस ठाण्यात उपस्थित होते.