
दोडामार्ग : कुडासे भोमवाडी व धनगरवाडी येथे फुटलेल्या तिलारी धरणाच्या गोव्याला जाणाऱ्या डावा कालव्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काम लवकरात लवकर पूर्ण करून गोवा राज्याला पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्याचे प्रयत्न चालू आहेत. तिलारीच्या गोव्याला जाणाऱ्या डाव्या कालव्याला भगदाड पडले त्यामुळे गोव्याला होणारा पाणी पुरवठा बंद झाला. कारण गोव्याला सध्या पिण्याच्या पाण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र याच कालव्याच्या काॅंक्रीटच्या भिंती अनेक ठिकाणी म्हण्यापेक्ष पूर्ण कालवा ढासळला आहे. त्याची दुरुस्ती होणे, हेसुद्धा तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे हि दुरूस्ती लवकरात लवकर करावी, अशी मागणी केली जात आहे.
सध्या कालव्या खालून जाणाऱ्या मोरीच्या दुरुस्तीचे काम जोरात सुरू आहे. या मोरीचे फुटलेले पाईप व माती काढून तेथे नवीन पाईप घालण्याचे काम अतिशय युद्धपातळीवर सुरू आहे. त्यानंतर मातीचा भराव घालून कालवा तयार केला जाणार आहे. येत्या चार दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत करा अशी मागणी गोवा सरकार करत आहे. त्यामुळे कामाचा पद्धतशीर निपटारा करून पाणी सुरू केले जाणार असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
गोव्याच्या धरतीवर कालव्याची दुरुस्ती करा
धनगरवाडी येथे फुटलेल्या कालव्याच्या दुरुस्तीचे काम येत्या काही दिवसांत पूर्ण केले जाईल. मात्र याच कालव्याच्या काॅंक्रीटच्या भिंती अनेक ठिकाणी ढासळल्या आहेत. त्यांना तडे गेले आहेत. याची दुरुस्ती होणे अत्यंत गरजेचे आहे. कारण एखाद्या लोकवस्ती जवळ जर कालवा फुटीची घटना घडली, तर त्याचे दुष्परिणाम येथील ग्रामस्थांना भोगावे लागणार. त्यामुळे गोव्याला जसे कालव्याचे काम केले आहे तश्या पद्धतीने आपल्या कालव्यांची कामे करा. असे येथील सर्वसामन्या शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.