
सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्ह्यात साहित्य चळवळ पुढे नेण्याचे काम करत आहे. कोमसाप सावंतवाडी शाखेचे काम उत्तमरित्या सुरु आहे . मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, आपली बोलीभाषा सर्वांनी टिकवली पाहिजे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सावंतवाडी शाखेला साहित्य चळवळ व मराठी भाषा संवर्धनासाठी आपण निश्चितपणे सर्वतोपरी सहकार्य करेन, असे आश्वासन राज्याचे माजी शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी दिले.
सावंतवाडी येथे गेल्या महिन्यात कोकण मराठी साहित्य परिषदचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन झाले. या साहित्य संमेलनाचे श्री. केसरकर हे स्वागताध्यक्ष होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून राज्याचे मराठी भाषा मंत्री असताना श्री. केसरकर यांनी केंद्रस्तरावर विशेष प्रयत्न केले होते. मराठी भाषा संवर्धन व जतन साठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग शाखेच्या माध्यमातून सावंतवाडी शाखेतर्फे आज गुरुवारी माजी मंत्री दीपक केसरकर यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शाखेचे अध्यक्ष अॅड. संतोष सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात महाराष्ट्रदिना निमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडीचे उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सचिव सौ. प्रतिभा चव्हाण, सहसचिव राजू तावडे, सदस्य सौ. मेघना राऊळ, विनायक गांवस, शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी नगराध्यक्ष संजू परब, सचिन वालावलकर, अॅड नीता सावंत कविटकर, अशोक दळवी, गजानन नाटेकर, आबा केसरकर, बाबू कुरतडकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री. केसरकर म्हणाले, कोकण मराठी साहित्य परिषदने सावंतवाडीत दर्जेदार असे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन घेऊन ते यशस्वी केले. या संमेलनाला मला उपस्थित राहता आले नाही. यापुढे सावंतवाडीत साहित्य चळवळ अधिक व्यापकतेने पुढे नेण्याच्या दृष्टीने साहित्य उपक्रम व संमेलने घेण्यात यावी. त्यासाठी माझे सहकार्य राहील. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषा टिकवण्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावूया. बोलीभाषाचे जतन होणे गरजेचे आहे आणि ते काम कोकण मराठी साहित्य परिषद नक्की करेल असे ते म्हणाले. यावेळी सूत्रसंचालन वैभव खानोलकर यांनी केले.