रानटी हत्तींना रोखण्यासाठी वेधलं आशिष शेलारांचं लक्ष

Edited by: संदीप देसाई
Published on: June 19, 2023 16:53 PM
views 71  views

दोडामार्ग :  दोडामार्ग तालुक्यातील रानटी हत्तींवर तोडगा काढण्यासाठी तातडीने संयुक्त बैठक घेण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र विकास मंचचे अध्यक्ष जितेंद्र सावंत आणि कुंब्रल गावचे ग्रामस्थ गिरीश परब यांनी एका निवेदनाद्वारे भाजपा आमदार आशिष शेलार यांच्याकडे केली आहे. 

       दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, दोडामार्ग तालुक्यातील तळकट, कोलझर, कुंबल, शिवरलं, उगाडे, झोळंबे, फुकेरी व इतर गावांमध्ये श २२ वर्षांपासुन रानटी हत्तींचा उपद्रव फार मोठया प्रमाणात वाढला आहे. रानटी हत्ती हे मानवी वस्तीत येऊन शेती, बागायतींचे फार मोठया प्रमाणात नुकसान करीत आहेत. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी शेती करणे बंद केले आहे. इतकेच नव्हे तर मागच्या काही वर्षात बऱ्याच व्यक्तींना या रानटी हत्तींनी जखमी केले आहे. परिणामी दोडामार्ग तालुक्यातील सर्व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

       दोडामार्ग तालुक्यातील या रानटी हत्तींवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक वनविभाग हे पूर्णपणे अयशस्वी ठरले आहे. त्यामुळे या हत्तीप्रश्नी आपण शासन स्तरावर लक्ष घालून यावर तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांची संयुक्त बैठक आम्हां लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत तात्काळ आयोजित करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.