
सावंतवाडी : वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान आणि त्यासाठी गुन्हेगारी जगतात त्याचा होणारा दुरूपयोग याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने वेगाने पावलं उचलण्यास सुरूवात झालेली आहे. गेले काही महिने पोलीस अधीक्षक स्वतः या जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संस्था, गावातील ग्रामस्थ, नागरीक, उद्योजक यांच्याशी संवाद साधून समस्या जाणून घेत आहेत. त्या अनुषंगाने नुकतीच वेबसाइट अपडेट करण्यासाठी व त्यावर विचारविनिमय आणि चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. अधीक्षकांच्या कक्षात ही बैठक संपन्न झाली. लवकरच सर्वसामान्यांना समजेल अशी वेबसाईट कार्यरत करण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत असे प्रतिपादन पोलीस अधीक्षकांनी केले.
या बैठकीत पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक व तांत्रिक क्षेञात तज्ज्ञ असलेल्यांची बैठक बोलावण्या मागची भूमिका स्पष्ट केली. सिंधुदुर्ग पोलीस दलाची आता असलेली वेबसाइट ही परीपूर्ण नाही. बदलते तंत्रज्ञान आणि गुन्ह्यांच स्वरूप लक्षात घेता ती परिपूर्ण करण्याची गरज आहे असं ते म्हणाले. यावेळी चर्चा करताना सामाजिक कार्यकर्ते ऍड. नकुल पार्सेकर यांनी अधीक्षकांच्या या कल्पनेच स्वागत केले. जिल्ह्यातील मुलांच्या बाबतीत जे काही गुन्हे घडतात त्यासाठी कायद्यामध्ये असलेल्या विशेष तरतुदींचा तसेच अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणा संदर्भात आणि बाल कामगार प्रतिबंधक कायद्याची माहिती देण्याबाबतची सुचना केली. दिवसेंदिवस सायबर क्राईमचे प्रमाण वाढत असून त्याबद्दल जनजागृती अंतर्भूत करण्याचीही सुचना करण्यात आली. अनेक वर्षे बालकल्याण समितीवर काम केलेले अँड. पी.डी. देसाई यांनी पोक्सो कायदा त्याची अंमलबजावणी व गुप्तता याबाबत विषय मांडला. उपक्रमशील शिक्षक व साहित्यिक कमलेश गोसावी यांनी शालेय विद्यार्थ्यांना गुन्हेगारी पासून परावृत्त करण्यासाठी काही त्रोटक स्वरूपात बालकांच्या बाबतीत गुन्हा घडल्यास त्या अनुषंगाने कायद्याची माहिती अंतर्भूत करण्याची सुचना केली.
हाॅटेल व्यवसायिक व स्तंभलेखक सतीश पाटणकर यांनी या जिल्ह्यात इतर भागातून येणारे व्यवसायिक किंवा भाडेकरू यांची माहिती कलेक्शन करण्याबाबत विचार व्हावा अशी सुचना मांडली. संगणक अभियांत्रिकी महाविद्यालय ओरसच्या उपप्राचार्या श्रीमती पुनम कदम यांनी सायबर गुन्ह्याबाबत गांभीर्याने विचार करून आपले तंत्रज्ञान अधिक विकसित करणे आवश्यक असल्याचे सांगितले. वेबसाइट एक्सपर्ट सिध्दार्थ सौदागर यांनी यावेळी तांञिक माहिती दिली.उपस्थितांनी मांडलेले सर्व मुद्दे विचारात घेऊन लवकरच सर्वसामान्यांना समजेल अशी वेबसाइट कार्यरत करण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी केले. या बैठकीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे राजेंद्र पाटील, सायबर क्राईम विभागाचे सुरज पाटील, पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर, समुपदेशक सौ. नमिता परब, ओरस संगणक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सायली साटम, विदिशा गवस आदी उपस्थित होते.