
दोडामार्ग : तिलारी धरण उद्या शनिवारी दुपारपर्यंत सांडवा पातळी पर्यंत भरणार असून त्यानंतर कोणत्याही क्षणी धरणातील अतिरिक्त पाणी तिलारी नदीत पोहचणार असल्याने तीलारीच्या अधिकाऱ्यानी पुराचा फटका बसणाऱ्या महाराष्ट्र व गवा राज्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याबत तिलारी प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी यांनी तसे लेखी निवेदन संबधित यंत्रणांना ईशू केलं आहे. तीलारीतून आजच पाणी विसर्ग सुरू झाल्याचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा तो व्हिडिओ चुकीचा असून त्यावर कोणीही विश्वास ठेऊ नये असे आवाहन सुद्धा तीलारीच्या अधिकाऱ्यानी केलं आहे.
जिल्ह्यातील तिलारी धरणातून पाणी सोडल्याचा एक व्हिडिओ शुक्रवारी महाराष्ट्र व गोवा राज्यातही व्हायरल झाला. मात्र तो अगोदरच्या वर्षीचा असून अद्याप पर्यन्त तिलारी धरणातून कोणतेही पाणी तिलारी नदीपात्रात सोडण्यात आलेले नाहीय.
सायंकाळी ४ वाजेपर्यंत तिलारी धरणाची पाणी पातळी १०५.०० मी असुन अद्याप सांडव्यावरून पाणी चालू झाले नसल्याचा खुलासा तिलारी प्रकल्प अधिकाऱ्यांनी दैनिक कोकणसाद कडे केला. मात्र उद्या २२ जुलै २३ ला दुपार नंतर सांडव्यावरून पाणी वाहण्याची शक्यता असल्याची माहिती तिलारीचे उपविभागीय अधिकारी गाजनान बुचडे यांनी कोकणसादला दिली.
गेल्या आठवड्यात धो धो कोसळलेल्या पावसानंतर पुन्हा गेले दोन दिवस तसाच पावसाचा जोर सर्वत्र वाढला आहे. यामुळे तिलारी धरणाची पाणी पातळी वेगाने वाढत होती. गुरुवारी तिलारी खोऱ्यात झालेल्या धुवाधार पावसामुळे तिलारी नदीच्या पाणी पातळीत सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र सदरचे पाणी खराडी नाल्यात आलेल्या पुरामुळे वाढले होते. तिलारी धरण शुक्रवारी पहाटेपर्यंत 69 टक्के भरले होते. तर सायंकाळी 4 वाजता 105 मीटर इतकी पाणी पातळी झाली असल्याचे अधिकारी यांनी सांगितलं. त्यामुळे शुक्रवारी दुपारनंतर तीलारी मुख्य धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची दाट शक्यता आहे. आणि त्यानंतरच तिलारी धरणाचे पाणी हे तिलारीच्या नदीपात्रात पोहचणार आहे. असे असतानाही गुरुवारपासून कोसळणाऱ्या पावसामुळे पत्रात पाण्याची पातळी वाढल्याने काही लोकांनी गतवर्षीचा तिलारीच्या सांडवा धरणातून पाणी विसर्ग होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे गोंधळ उडाला, मात्र कोकणसाद ने तीलारीच्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला असता त्यांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत तिलारी धरणाचे पाणी तिलारी नदी बिलकुल सोडले नसल्याचे स्पष्ट केलं. तर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या त्या व्हिडिओवर कोणी विश्वास ठेवणे असेही आवाहन केले .
अवघ्या आठवडाभरापूर्वी तीलारी धरण अवघे 22 टक्के इतकच भरलं होतं, मात्र गेल्या आठवड्याभरात तिलारी धुवाधार झालेल्या पावसामुळे वाढवून शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत हेच धरण सुमारे 80 टक्के च्या जवळपास भरले. त्याच पार्श्वभूमीवर तिलारीचे विभागीय अधिकारी गजानन बुचडे यांनी तिलारी नदी पात्राच्या दुतर्फा वसलेल्या गावांना शुक्रवारपासून तिलारी धरणाचे अतिरिक्त पाण्याचा सांडव्यावरून थेट पुच्छ काव्यातून तिलारी नदी पात्रात विसर्ग होणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे शनिवार नंतरच पावसाची संततदार कायम राहिल्यास तिलारी नदीकाठच्या व गोवा राज्यातील पेडणे बिचोली येथील नदीकाठच्या गावांनाही पुराचा धोका संभवू शकतो. मात्र आज रोजी तरी सर्व परिस्थिती अंडर कंट्रोल असल्याचे तिलारीचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
पहाटे नंतर कधीही होऊ शकतो विसर्ग
तिलारी मुख्य धरणाची पाणी पातळी आता 105.30 मी. असून धरणाच्या सांडव्यावरुन पाणी वाहून जाणारी पाणी पातळी 106.70 मी आहे. म्हणजेच सांडव्या पर्यंत पाणी येण्यासाठी अद्याप 1.40 मी पाणी पातळी कमी आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाचा विचार करता उद्या 22/07/2023 रोजी पहाटेनंतर केव्हाही तिलारी मुख्य धरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु होवून नदिपात्राची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. तरी नदीकाठच्या ग्रामस्थांना इशारा देण्यात येतो की, उपरोक्त कालावधीनंतर पाणी पातळी कधीही वाढणार असल्याने जिवित व वित्त हानी टाळण्यासाठी नदीपात्रामध्ये उतरू नये व आवश्यक सावधानता बाळगावी. सदरचा इशारा गाव पातळीवरून गावात दवंडी देवून देण्यात यावा व सहकार्य करावे. अफ़वांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन तिलारीचे कार्यकारी अभियंता व्ही. बी. जाधव यांनी केलंय.