धुरळा उडवत जाणाऱ्या रेल्वेंना थांबा मिळाला पाहिजे : ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे

Edited by: विनायक गावस
Published on: August 09, 2023 18:49 PM
views 228  views

सावंतवाडी : कोकण विकासाचे प्रश्न कायमच कासवगतीने सुटत आहेत. कोकण रेल्वे आणि कोकण महामार्ग ( मुंबई ते गोवा) बराच काळ लोटला तरी प्रवाशांना समस्या भेडसावत आहेत .त्यामुळे पंतप्रधान, मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री, केंद्रीय बांधकाम मंत्री यांचे एसएमएस, ईमेल आदी सामाजिक माध्यमातून लक्ष वेधून घेतले पाहिजे असे मत ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांनी 'गराजलो रे गराजलो'च्या फेसबुक लाईव्ह मुलाखती दरम्यान व्यक्त केले.


श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था निर्मित "गराजलो रे गराजलो"या नाटकाद्वारे जनजागृती करता-करता १५ मुद्दे घेऊन निस्वार्थीपणे गराजलो रे गराजलो एक चळवळ सुरू केली आहे. ही चळवळ घराघरात पोहोचविण्यासाठी त्यांचे अथक प्रयत्न सुरु आहेत. या चळवळीचाच एक भाग म्हणजेच "लाईव्ह मुलाखत चर्चा सत्र"भाग-३०२ वा या उपक्रमाअंतर्गत रविवारी मुलाखतकार सहदेव धर्णे यांनी ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे यांची "लाईव्ह मुलाखत चर्चा सत्र" घेतले.  यामध्ये मुलाखती दरम्यान पत्रकार लोंढे बोलत होते.


कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका तरी स्थानकावर थांबल्या पाहिजेत. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित करण्यात आला आहे त्यामुळे सावंतवाडी, कुडाळ व कणकवली या प्रमुख रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेस गाडीला थांबा मिळाला पाहिजे. सुमारे दहा ते पंधरा रेल्वे गाड्या फक्त धुराळा उडवत जात आहेत. त्या गाड्यांना थांबा मिळाला पाहिजे. तसेच प्रमुख स्थानकावर छप्पर हवं, जेणेकरून उन्हा - पावसाळ्यात प्रवाशांना होणारा त्रास थांबेल असे लोंढे म्हणाले. सावंतवाडी शहराच्या बाहेरून महामार्ग व रेल्वे मार्ग गेल्याने ऐतिहासिक वारसा लाभलेला शहरातील उलाढालीवर आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर टर्मिनस व्हावे म्हणून माजी आमदार कै. जयानंद मठकर व मंत्री दीपक केसरकर यांनी आंदोलनात्मक पावित्र्या घेतला होता. दरम्यान सिंधुदुर्गचे सुपुत्र सुरेश प्रभू रेल्वेमंत्री झाले. सावंतवाडी रेल्वे स्टेशन टर्मिनसला चालना मिळाली. रेल्वे स्टेशनवर पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी भूमिपूजन झाले. दोन टप्प्यांत काम करण्याचं ठरवलं गेलं. मात्र पहिल्या टप्प्याचे काम केले आणि दुसऱ्या टप्प्यांतील कामांचा निधी परत गेला. तो निधी पुन्हा उपलब्ध करून रेल्वे टर्मिनस पायाभूत सुविधांची निर्मिती झाली पाहिजे. कोकण रेल्वेला महाराष्ट्र सरकार व भूमिपुत्रांचे मोठं योगदान आहे. मात्र रेल्वेत कोकण दिसत नाही हे दुर्दैव आहे असे त्यांनी सांगितले.

कोकण रेल्वेने गणेश चतुर्थी, शिमगोत्सव, दिवाळी, मे महिना आणि प्रसिद्ध जत्रोत्सवाचे भारनियमन पाहून रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले पाहिजे. त्यासाठी मागणी करावी लागते हे दुर्दैव आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सावंतवाडी - दिवा बरोबर आणखी एक रेल्वे सोडणे, कल्याण - वसई सावंतवाडी रेल्वे सोडली पाहिजे. कोकण रेल्वेचे प्रवासी भारनियमन, प्रवासात होणारी गैरसोय मंत्री व लोकप्रतिनिधी यांनी आँखो देखी पाहून प्रवाशांचा सुखकर प्रवास होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कोकण, ठाणे, मुंबई आदी भागातील सर्व खासदारांना मतदान करणाऱ्या कोकणातील जनतेने, चाकरमानी यांनी लोकप्रतिनिधींना साकडं घातलं पाहिजे असे ते म्हणाले.

कोकण रेल्वे आणि मुंबई - गोवा महामार्गावर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री,रेल्वेमंत्री, केंद्रीय बांधकाम मंत्री व सर्व संबंधितांना ईमेल, एसएमएस किंवा अन्य सामाजिक माध्यमातून लक्ष वेधून घेतले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. घरोघरी मेडिकल स्टोअर्स निर्माण झाली आहेत त्यामुळे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले पाहिजे. लोकांनी जमीनी परप्रांतियांना विक्री करू नये तसेच समुह शेती व शेतीपूरक व्यवसाय सुरू केला पाहिजे. शेती व बागायती वन्य प्राण्यांपासून वाचवल्या पाहीजेत अस मत त्यांनी या मुलाखतीत व्यक्त केले.